सीता
सीता
हो बरोबर ऐकलेत तुम्ही...सीताच आहे मी,
कुठून?कशी?का? हे सगळे प्रश्न गरजेचे आहेत ?
कुठेतरी मन मोकळे करावेसे वाटले म्हणून आले
निवांत दिसलात म्हणून बोलायला आले
न विचारता ,न सांगता आले म्हणून रागावू नका हं..
खरे सांगू का रागाची ना भीतीच वाटते मला,
कैकयी मातेच्या रागाने वनवास दिला
लक्ष्मणा च्या रागाने कापले नाक शुर्पणखेचे
माझे अपहरण बनले कारण तिच्या मानहानीचे
मात्र बदनाम झाले मी मागितले म्हणून
सोन्याचे मृगाजिन..
शरीरावर झालेल्या जखमांपेक्षा मन जास्त दुखावले
जेव्हा रामाच्या ऐवजी हनुमान समोर आले
लढाई मध्ये जय मिळवून जेव्हा मला परत आणले
तेव्हा हरलेल्या मनाला आणखीनच ,
पराजित झाल्यासारखे वाटले
रावणाने नेले तो जिंकला ,रामाने लढाईत मला जिंकले
पण मग मी कुठे आहे?ह्या सगळ्यात ..
जेव्हा एका धोब्याच्या संशयाला उत्तर देण्यासाठी,
रामाने मला अन् माझ्या उदरातल्या त्याच्या अंशाला,
जंगलात सोडून दिले ...
की पुरुषार्थ गाजवायला ह्यांना नेहमी बाई च लागते.
माझे ऐकून हरणापाठी गेलेला राम का नाही थांबला ....
माझे मनोगत ऐकायला ,जेव्हा त्याने माझा त्याग केला
मागे न बघता न विचलित होता तो जेव्हा गेला ,
तेव्हा तो मर्यादा पुरुषोत्तम होता..
म्हणूनच मी त्याच्यातल्या पुरुषाला नाकारत
भूमी जवळ केली अन् माझ्या वरच्या अन्यायाची
ही सल सतत त्याच्या मनात जागी ठेवली.
पुराणातली वांगी नाही ही ना नुसतीच कथा..
आजही अनेक सीता रामाने त्याग केल्यावर
त्याची वाट बघत आहेत.
आजही अनेक लवकुष आपल्या वडिलांचे
दार ठोठावत आहेत,त्यांच्या अधिकारासाठी.
आणि अनेक सीता आजही आपल्याच दुःखात
अंधाराला जवळ करून लुप्त होत असतात.
नका थांबू तुम्ही हनुमान ,राम,किंवा जटायू साठी
स्वतः लढायला तयार व्हा मग बघा
सगळे जग येईल तुमच्या मदतीसाठी
