STORYMIRROR

Shraddha Kandalgaonkar

Abstract Classics

3  

Shraddha Kandalgaonkar

Abstract Classics

यश असेही

यश असेही

2 mins
162


खूप प्रयत्न करून, पडत धडपडत त्याने पहिल्यांदा एकट्याने सायकल चालवली तेव्हा त्याच्या मनात यशाचे कारंजे थुईथुई नाचत होते.


फुटबॉल ची मॅच शत्रू क्लब बरोबर जिंकल्यावर त्याच्या साथीदारांनी आणि त्याने त्यांच्या क्लब समोर येऊन खूप नासधूस केली.त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आले की यशाची हवा त्यांच्या डोक्यात गेली आहे.


गरिबीत राहून कष्ट करून आपल्या मुलीला डॉक्टर करायचे स्वप्न त्या दोघांनी बघितले होते.ज्या दिवशी ती डॉक्टर झाली त्या दिवशी ,"आपल्या बाळासारखे आता कोणी औषध पाण्याशिवाय मरणार नाही ." असा विचार करताना त्यांचे आणि त्यांच्या मुलीचे यश त्यांच्या मनात मावत नव्हते.


गुंडांच्या तावडीतून आपली गाय सोडवून आणताना तिने आणि तिच्या नवऱ्याने खूप धडपड केली.त्यांच्याशी जीवाच्या आकांताने लढत दिली. गाय आपल्याबरोबर परत नेताना तिने हळूच फाटक्या पदराने त्याचा घाम पुसला तेव्हा तो म्हणाला,"राहूदे तो ,आपल्या यशाची पावती आहे ती.जपून ठेवू थोडा वेळ अन् मिरवत जाऊ गावापर्यंत."


पिल्लू हरवल्यामुळे ती वाघीण बेचैन झाली होती.सगळीकडे त्याला हुंगत शोधत होती.हळुवार आवाजात म्याऊ म्याऊ ओरडत होती. सगळे जंगल कर्मचारी तिची चलबिचल अनुभवत होते.समोरच्या कॉम्प्युटर वर तिच्या हालचालींचा मागोवा घेत होते.दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी एका गुहेत अडकलेले तिचे पिलू तिला दिसले . पिल्लाजवळ जात तिने मोठ्या आवाजात डरकाळी फोडून आपल्या यशाची बातमी सगळीकडे पोहोचवली.


भयंकर अपघातात त्याचा एक पाय तोडवा लागल्यावर,अनेक महिन्यांच्या उपचारानंतर तो घरी आला.मेहनत करून जयपूर फूट लावून तो चालायला लागला.अथक प्रयत्नानंतर जेव्हा त्याने marathon जिंकली तेव्हा त्याने आपले यश एका पायावर नाचून साजरे केले.


नवऱ्याने केलेल्या अत्याचारानंतर दहा वर्षांनी असह्य होऊन तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.गावातली मुलगी कशी एकटी राहणार ? असा विचार तिच्या आईवडिलांनी केला.तेव्हा त्यांच्या कडून थोडे पैसे उधार घेऊन ,एक साधी खोली भाड्यावर घेऊन ती तिथे राहायला लागली . दवाखान्यात तिला कंपाऊंडर ची नोकरी मिळाल्यावर, आपल्या फाटक्या साडीचा पदर फाडून तिने दारावर बांधला.आणि शेजारणीला म्हणाली,माझ्या छोट्याशा यशाचे तोरण मी आज बांधले.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract