नात्याची बेडी
नात्याची बेडी
आज तरी नको ना रे देवा
ती आई,ती मुलगी ,ती बायको,
ती मैत्रीण ,ती बहिण........
सगळ्या ह्या नात्यांच्या बंधनात
गुदमरतो आहे जीव माझा..
निदान आज तरी माझा विचार करा
एक व्यक्ती म्हणून..
विसरून बाकी फाफट पसारा..
एकदा बघ माझ्याकडे तुझी एक
उत्तम निर्मिती म्हणून...
जिला स्वतःची आहे बुद्धी,
व्यक्त व्हायची आहे शक्ती,
हृदयाच्या ठोक्यावर आहे प्रीती,
दुःखाची श्रमाची नाही क्षिती..
एकदा तरी उडू दे मुक्तपणे
आकाशात ...
कुठल्याही बंधनाशिवाय
आयुष्य जगताना,
एक दिवस माझा म्हणताना,
तुझी ही पुरुषी मानसिकता
असलेली जमात,सगळी
बिरूद लावून शुभेच्छा देऊन
खेचतात मला मागे...
ठेवतात मानेवर ओझे अपेक्षांचे
बघतात मजा माझ्या उडणाऱ्या
धडपडणाऱ्या मनाची..
सुरू झालेला
संपतो कधी हा दिवस
कळत नाही देवा...
सांगू का तुला एक युक्ती..
वर्षातले समान कर सारे दिन
दे सगळ्यांना बुद्धी,
आहे दोघां कडेही मन,
वापरू नेहमी ते
आम्ही सारे जन.
उचलू भार संसाराचा ,
मानून सृष्टीचे ऋण.
आज मागते तुझ्या कडे एक वर
कृपा असुदे तुझी आम्हा सर्वावर
हा पुरुष ही स्त्री ह्या कुपमंडुक
वृत्तीतून मिळो आम्हा सर्वांना मुक्ती.
मनासारखे जगू ,मुक्त व्यक्त होऊ
नात्यांच्या परिघात मलाच फक्त,
नको मन मारून जगायची ही सक्ती.
