काव्यसंध्या
काव्यसंध्या
ओठांत गुंफल्या काही स्वर्गीय स्वरांच्या ओळी
शब्दांनी भिजवित गेली ती कविता संध्याकाळी
आभाळ वाकले खाली जलदांनी केली गर्दी
पाखरे घालती घिरट्या रानात पसरली सर्दी
गोंजारत फिरती ओळी कोवळ्या तृणांना येथे
धुंदीत डोलवी माना साळीची हिरवी शेते
चौफेर उधळतो वारा अत्तर त्या रानफुलांचे
खळखळतो निर्झर वेडा पाहती खडक काठांचे
कल्पना खेळते नयनी सत्याला सोबत घेते
अलवार पाउली कविता स्वप्नांच्या गावी नेते
स्पंदने उसळता हृदयी एकेक ओळ मग स्फुरते
अर्थाचे प्रगटन होता जग ओंजळीतले उरते
मेंदूच्या पटलांवरती जुळतात शब्द भावाचे
गुंतून रेशमी धागे क्षण विरघळते काळाचे
सोहळा समेवर येता रजनीश भैरवी गातो
देऊन दाद गवयाला मग सूर्य लयाला जातो
