STORYMIRROR

Prashant Bhandare

Romance Inspirational Others

3  

Prashant Bhandare

Romance Inspirational Others

शिशिर सकाळ

शिशिर सकाळ

1 min
192

मस्त गुलाबी थंडी, येथे धुके केवढे पडले

पण गवताच्या शेंड्यावरती, कोण बिचारे रडले?

थरथर हलते फूल चिमुकले, दात वाजती त्याचे

लोंब वाकडे करत धान, ते शेतामध्ये नाचे


वेलीवरची कळी निरागस, शांत झोपुनी असते

खट्याळ वारा धक्का देता, गाल फुगवुनी रुसते

ऊन कोवळे शेकत बसते, तारांवरती पक्षी

दूर गोपुरे धूसर दिसती, कळस भासते नक्षी


रस्ते सारे सामसूम, अन पायवाट ती ओली

हिरवे,निळसर सर्व झाकले, शुभ्र धुक्याच्या खाली

वाटेवरुनी किती धावती कीटक, गोगलगायी 

ओळख होते सर्वांची, मग जाता पायी पायी


रस्त्यावरती हिंडतात बघ, तरुणाईच्या जोड्या

केसांवरती पडता दव, कण जेष्ठ भासती थोड्या

म्हाताऱ्यांनी बाकावरती, मंडळ स्थापन केले

हात पाय तर फार हलवती, थरथरणारे किल्ले


प्रभात काळी दृश्य विहंगम, जागोजागी दिसते

आरोग्याचे सुरेल गाणे, सभोवताली हसते

मंद मंद तो वात धुंद, नित अंगावरती घ्यावा

गोड गुलाबी थंडीमध्ये, प्रेमतराणा गावा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance