"प्रॉमीस"
"प्रॉमीस"
मी तुला प्रॉमीस करतो आपण आपल्या
नेहमीच्या बागेत ठीक 6 वाजता भेटू .
तू बरोब्बर पावणेसहाला ये.
पण हां...प्रॉमीस जरी करतोय,
तरी इकडे तिकडे होऊ शकतं,
तुझं माझ्यावरचं प्रेम
वाट पहायला लावू शकतं..
पण ,तू तिथेच रहा,
माझी थोडी वाट पहा..
जे वेळ पाळतात त्यांचंच
प्रेम टिकतं असं नाही,
जे वेळ टाळतात त्यांचं
प्रेम हुकतं असंही नाही..
अशा फुटकळ प्रॉमीसांवरती प्रेमाची इमारत
उभीही राहत नाही आणि कोसळतही नाही..
पण हो,तुझा हात हातात घेऊन,
त्या हातावर दुसरा हात ठेवून ,
नजरेत नजर बांधून ,
तुझ्यामाझ्या काळजाला सांगुन.
जे प्रॉमीस मी तुला केलंय ते मात्र लक्षात ठेव.
बाकीचे सहा जन्म उडत गेले,
हा जन्म मात्र माझ्यासाठी तू,
आणि तुझ्यासाठी मी आहे
मग हे जगसुद्धा उडत गेले...
काय मग पाहशील ना वाट?
तसा मी येतोच सहापर्यंत.......