तुृझ्यावरच्या कवितेत
तुृझ्यावरच्या कवितेत
कधी कधी वाटतं मला तू जवळची
की तुझ्यावर होणारी कविता
प्रश्न पडतो मला
उत्तर शोधावं असं जरी ठरवलं
तरी मिळत नाही ते
आणि मी आणखीन हरवून जातो
तुझ्या आणि त्या कवितेच्या विश्वात
जिथे मी अजूनही ओळखायचा
प्रयत्न करतोय
तुला अाणि माझ्या कवितेलाही
कारण कितीही ओळखतो असं
जरी म्हटलं तरीही
तुझे अन् त्या कवितेचे
नवनविन पदर खुलत जात आहेत
अगदी रोज
भ्रमर जसा मकरंद शोधावयास जातो त्या फूलाच्या अंतरंगात
आणि शेवटी ते फुलही
पाकळ्या मिटून घेतं
आणि कैद करतं त्या भ्रमराला
कारण त्यालाही पहायचं असतं
त्या भ्रमराला
एकदा तरी मिठीत घेऊन
अन् पुन्हा सकाळी ते फूल मुक्त करतं त्या भ्रमराला
त्याच्या मकरंदासह
अन् त्याचं सारं अस्तित्वच पूर्ण होतं
अगदी तसंच तुझं आणि तुझ्या
कवितेचंही आहे
तू जवळ येताच मला
कैफ चढतो तुझ्या नशेचा
अन् मी तुझा कणन् कण
माझ्या मनात रिचवायचा
प्रयत्न करत असतो
मात्र ते कधीच शक्य होत नाही
कारण तू ही जाणून आहेस
तुझ्या माझ्यातलं एक निखळ नातं जे भावनांचा अतिरेक झाला तरीही त्याला जोड देतं निरागसतेची
अन् ती कविता मला साथ देते
ती निरागसता टिकवायला
कारण त्या निरागसतेतच
अडकलंय सारं काही
जे तुझ्या माझ्यात न ठरवताच
कराराच्या रूपात
लिखित झालंय
तुझ्यावरच्या कवितेत,
नाही का???