मदनाची बाधा
मदनाची बाधा
केसांत माळता गजरा
तू असाच सायंकाळी
मदनाची बाधा मजला
त्या कारतवेळी होई...।।धृ।।
अलवार बिलगता सखया
मज कवेत आपुल्या घेशी
अनुराग उमाळे हृदयी
चंदनात ये न्हाऊनी
मदनाची बाधा मजला
त्या कातरवेळी होई.......।।१।।
एक एक क्षणाची ग्वाही
मग चंद्र चांदण्या देती
चिरतरुण जाहली प्रिती
त्या मादक संध्याकाळी
मदनाची बाधा मजला
त्या कातरवेळी होई.......।।२।।
लटकेच रागे भरताना
किती सांग विनवण्या करशी
गालांची कळी खुलताना
अधरांची गुंफन होई
मदनाची बाधा मजला
त्या कारतवेळी होई.......।।३।।

