STORYMIRROR

Prashant Bhandare

Fantasy Inspirational Others

3  

Prashant Bhandare

Fantasy Inspirational Others

सृष्टीचे पालक

सृष्टीचे पालक

1 min
229

दिसे एकटा उदास पक्षी शुष्क वाळल्या झाडावर

कशी पसरली मरगळ सांगा उष्ण विखारी वाऱ्यावर

कुणी पेरले बीज विषाचे अवतीभवती तारांने

पक्षी सारे संपत गेले ध्वनिलहरींच्या माऱ्याने


अवकाळी थयथयाट करते वीज बनुनी नर्मुन्डा

शीतल अवनी आता झाली धगधगणारी चामुंडा

कुठे खोदल्या खाणी आणिक किती शोषले धरणीला

लोभ म्हणू की मूर्खपणाचा कळस मानवी करणीला


नदी कोरडी, तळे कोरडे धरा फाटली भेगांनी

दुष्काळाशी नाळ जोडली तळहाताच्या रेघांनी

बदलत गेले सर्व ऋतू अन गुदमरलेला श्वास इथे

डोळ्यामध्ये पाणी आणिक ढगाविना आभाळ रिते


ओरडुनी तो व्याकुळ पक्षी सांगत सुटतो सर्वांना

एक रोपटे लावा दारी सोडत साऱ्या गर्वाना

वसुंधरेचा नाश थांबवा भूमातेचे बालक व्हा

मनात ठेवा या सृष्टीचे मालक नाही पालक व्हा


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Fantasy