स्वप्न तू पूर्ण कर
स्वप्न तू पूर्ण कर
मित्रा! प्रेम करणं इतकं सोपं नसत
प्रेम हे दान करायची गोष्ट नसत
प्रेम असत दोन मानाचं मधुर मिलन
दोघांच्या मनात ते आपसूकच उमलत
तू प्रेम केलं तसं तिनं प्रेम केलं
तरच त्याला अर्थ अन प्रेम होत सार्थ
तूच ठरवतोस सर्वकाही, तिच्या नसताही गावी
असं कसं जमेल राजा? कशाला करतोस प्रेम एकतर्फी?
स्वतःही जळशील, तिलाही छळशील
पदरी तुझ्या फक्त निराशाच येईल
ना कुठलं ध्येय ना भविष्याची चिंत .
दोर तुटलेल्या पतंगासारखं स्वछंदी वागतोस
गुटख्यांन रंगल्या तोंडानं वणवण भटकतोस
मुलगी दिसली की घाणेरडे शेरे मारतोस
ती असते ध्येयाने झपाटलेली अन तू तिच्यापाठी
ती होईल अधिकारी वा रमेल तिच्या संसारी
होऊन होऊन होईल काय? तिच्यापाठी लागशील
तू स्वतःही जळशील, तिलाही छळशील ..
आधी प्रेमात वेडा होशील, प्रेमभंगातुन लयास जाशील
वेळ जाईल तेव्हा तिच्याच नावाने खडे फोडशील
मित्रा ! हे वयच असं असत पाय घसरण्याचं
चिंता नको करू होईल सारं तुझ्याच मनासारखं पण
तुला आता सावरायला हवं ,ध्येयाच्या दिशेने धावायला हवं
सोड व्यर्थ भ्रमंती, बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर घे गगनभरारी
तिचं काय ध्येय आहे ठरलेलं, निश्चित, अढळ
मित्रा! तुझं भविष्य तर अंधकारमयच ना?
आता तरी सावध हो, थांबव दिशाहीन प्रवास
आई - बाबान पाहिलेलं स्वप्न तू पूर्ण कर
