शाळेतील ते दिवस...
शाळेतील ते दिवस...
बालपणीच्या आठवणींचा
काळ सुखाचा होता
मैत्रीच्या आनंदाचा जणू
तो सुवर्णकाळ होता
अपेक्षांच्या ओझ्यापेक्षा दप्तर हलके होते
अबोल अशा भविष्यापुढे
बालपण खूपच बोलके होते
मजा मस्ती सगळं होतं
वेगळाच होता मैत्रिणीचा मेळा
ती सकाळची मंत्रमुग्ध करणारी शारदा मातेची प्रार्थना
शिक्षकांनी दिलेल्या त्या महत्वाच्या सूचना
पाटी-पेन्सिल वही पुस्तकांचा आगळाच होता लळा
भाषा विषयांच्या तासांना असायचा वेगळा सोहळा
कलाकृतीच्या आविष्कारांना मोकळा असायचा फळा
मधल्या सुट्टीत अंतरंगी आम्ही सारे व्हायचो गोळा
शिक्षक ही द्यायचे सूट
कधीकधी म्हणायचे मनसोक्त खेळा
आग्रह त्यांचा एवढाच होता थोडी तरी शिस्त पाळा
शिक्षक सुट्टीवर जाताना आनंदाने वर्गात मुले नाचायची
उद्याची परीक्षा आणि आज वह्या पुस्तके वाचायची
ते शाळेचे पटांगण ते मित्र मैत्रिणी सोबत तात्पुरते भांडण
हे दिवस आठवले की क्षणभरासाठी मन स्तब्ध होत
आणि वाटतं की ती मैत्री अन् लहानपण हे बरं होतं
ते दिवस त्या आठवणी भेटेल का पुन्हा अनुभवायला
भेटेल का आता ते मित्र-मैत्रिणी काही कळलं नाही तरी फक्त जोरात हसायला
शाळेतील ते दिवस येतील का पुन्हा, भेटेल का...?
त्या बालपणीच्या मैत्रीणी आणि तो वर्ग जुना
शाळा सुटता मागे पाने मिटली पुस्तकांची,
मैत्री आठवते आज ही त्या जिवलग मित्रमैत्रिणीची
पण शाळेतील ते दिवस नकळत निघून गेले सरतीला
अजूनही वाटते ते मित्र-मैत्रिणी यावे केव्हातरी परतीला...
