परोपकार
परोपकार
आज निघाला शाळेत त्याला आईने दिला डबा,
टंगळमंगळ न करता सगळा संपव म्हणाली बाबा
तिच्या खांद्यावर हात ठेवून बांधून घेतली तिच्याकडून बुटाची लेस
रूपया पकडून एका हातात घट्ट, दुसऱ्यानं सावरले केस
धावत धावत स्कूलबसमध्ये चढला बसला खिडकीच्या बाजूला
आजकाल फॅशनेबल जगात वावरायची सवय झाली होती राजूला
दररोज जायचा शाळेत पण आज अचानक ठरलं जाणं,
नोटीस आली वर्गात बरोबर घ्या प्रत्येकाने दप्तर आणि खाणं
बस निघाली दूरवर एके ठिकाणी थांबली जाऊन
हरखून गेली सगळी मुलं हे वेगळंच विश्व पाहून
ज्यांना नाहीत आई-बाप त्यांचं असं असतं जग,
काळजी घ्यायला नसतं कोणी क्षणोक्षणी जाणवते आयुष्याची धग
भेटून प्रत्येकाला तिथल्या विचारले त्यानं प्रश्न बरेच काही
शिकला त्यांच्याकडून भरपूर प्रत्येकवेळी त्याला आठवत होती आई
सगळ्यांच्या नकळत डोळे पुसत दिली त्यानं हाकेला साद
शिक्षकांनी दिलं पेनांचं पाकीट, म्हणाले सगळ्यांना वाट न घालता वाद
सगळी मुलं पडली त्याच्यावर तुटून पेन घेण्यासाठी
इतकंच कारण पुरेसं होतं त्याच्या गर्वाचं हरण होण्यासाठी
प्रत्येकाच्या केविलवाण्या चेहऱ्यावर होती एक आशा
त्याला वाटत होतं आश्चर्य मला का नाहीत भावना अशा?
माझं माझं म्हणत आलो माझं आहे तरी काय?
आपल्याकडे सगळं असून आपले नाहीत जमिनीवर पाय
मला आहे सगळं तरी मी किती निष्काळजी आणि अहंकारी
एकाच दिवसात त्याला समजली सारी दुनियादारी
पेन वाटताना त्याला काहीतरी मिळत गेलं
दुसऱ्यांसाठी जगायचं हे मर्म जीवनाचं कळत गेलं
घरी आल्यावर हमसून रडला आईला मारून मिठी
तू देव आहेस का विचारु लागला... का करते इतकं सगळं माझ्यासाठी?
आईनं दिलं उत्तर ते ऐकून तो शहारला खूप
इथून पुढं आई सांगेल तसं वागायचं बदललं त्याच्या मनानं रुप
प्रत्येक ठिकाणी जमत नाही जायला देवाला म्हणून त्यानं बनवली आई
आजपासून परोपकार हेच तुझं कर्तव्य... कारण "त्यांना" तर कुणीच नाही!