काजवा...
काजवा...
तम दाटता अंगणी
उजेड असतो हवा
म्हणून का रेंगाळतो
चिमुकला हा काजवा॥१॥
कीटक हा इवलासा
सृष्टीने कसा निर्मिला
चमकणारा रातीला
दुजा ना कोणी जन्मला॥२॥
पुच्छभागी पंखाखाली
रंग तेजाचा जपतो
वेधून लक्ष सर्वांचे
माणसांना खिळवतो॥३॥
स्वच्छंदी, हा स्वावलंबी
ध्यैयाने कसा लढतो
अल्पसे आयुष्य जरी
भरभरून जगतो॥४॥
गर्द सावळ्या रातीला
नभी साज सजवतो
येता झुळूक वा-याची
नजरेस भुलवतो॥५॥
स्वयंप्रकाशी काजवा
अस्तित्व त्याचे सांगतो
निराशेच्या या मनात
नवकिरण जागतो॥६॥
