दीपोत्सव
दीपोत्सव
दीपोत्सव आजकाल, दिव्यांचा राहिला नाही ।
लाभ झगमगाटाचा, वातीस कळला नाही ।।1।।
विजयश्री मिळवून, जरी परतला राम ।
वनवास वैदेहीचा, आजही संपला नाही ।।2।।
गर्विष्ठ साज दुनिया, ल्याली लख्ख प्रकाशाचा ।
उत्सव तेजाचा आता, पवित्र उरला नाही ।।3।।
प्रकाशदंभात होते, जे जळत रातदिन ।
अंधकार अंतरीचा, जाणून पाहिला नाही ।।4।।
मूर्तीच फक्त पुजूनी, केली भव्य महापूजा ।
आदर गृहलक्ष्मीला, कधीच दाविला नाही ।।5।।
स्वप्रकाशात तयांचा, कर्णकटू कोलाहल ।
चेतवून कोटी सूर्य, काजवा बोलला नाही ।।6।।
तू दिव्यतेजाची रास, मज वारसा तमाचा ।
दिपकराग अपुल्या, प्रेमाचा जुळला नाही ।।7।।
मातापित्यास दुखवी, मदांध घातकी बंधू ।
सण तो भाऊबीजेचा, म्हणून पाळला नाही ।।8।।