पळस
पळस
पळस
गेला सरून माघ,
धूर-धुक्याची लढाई ।
धुके टाकते मान,
उरे धुराची बढाई ।।
सरसावली सारी राई,
गर्द सावली दाटते ।
आडदांड चाफ्याला आज,
लाज स्वतःची वाटते ।।
तापलेल्या अंगणी,
आई वाळण मांडते ।
माहेराच्या काऊसाठी,
दाणे जाणून सांडते ।।
अंतःकरणाला वैशाख,
तिची प्रत्येक पहाट ।
रोज आईच्या डोळ्यात,
गौरी-गणपतीची वाट ।।
दूर रानात कोणी,
चार काटक्या वेचते ।
पिलांच्या पोटासाठी,
पाय निखारी टाकते ।।
किती उदासवाणे,
सारे भयाण भकास ।
जळणारे जाळणारे रान,
मन उदास उदास ।।
चटके खाऊन निजल्या,
आजोबांना मिळे समाधान ।
पानभर सावलीसाठी,
आयुष्याची दाणादाण ।।
स्वछायेच्या गर्वात,
देवळांचे कळस ।
हृदयाच्या आडोश्यात,
तळमळणारा पळस ।।