आदर्श नागरिक घडवण्यासाठी
आदर्श नागरिक घडवण्यासाठी
आदरणीय गुरुजी,
ओबडधोबड दगडाचे छिलके काढून
मुर्तीकार त्या दगडाला
ज्याप्रमाणे देवत्व प्रदान करतो
त्याप्रमाणं माझा मुलगा सुद्धा
आहे ओबडधोबड दगडासारखा
करा प्रामाणिक प्रयत्न
त्याच्यातील विकारांचं वेस्टन
बाजूला सारण्याचा
म्हणजे येईल त्याच्या अंगी
माणूसपण.......
द्या त्याला, गुरुभक्तीचे पाठ
म्हणजे सर्वार्थानं कळेल
त्याला राम आणि कृष्ण
सांगा त्याला,
विश्वामित्र,सांदिपनी आणि द्रोणाचार्य
यांचे रूप स्वतःच्या गुरुमध्ये
पाहायचे असेल तर,
स्वतःमध्ये विकसित कर
राम,कृष्ण आणि अर्जुनाचे गूण
मात्र तेव्हाही त्याला
लागेलच मार्गदर्शन
तुमच्यासारख्या अनुभवी गुरुंचे
कळू द्या त्याला
रुपगर्विता सृष्टीचे सौंदर्य... लावण्य
म्हणजे होईल तो भावविभोर
अन येईल त्याच्या अंगी - भुतदया
सांगावं त्याला ,
रंग आणि कुंचल्याशी खेळायला
म्हणजे त्याला हे जग
रंगहीन नं वाटता, वाटेल रंगिन
शिकवा त्याला
मातृभाषेवर प्रेम करायला
मात्र सोबतच सांगा त्याला
इतर भाषांचाही आदर करायला
म्हणजे होईल तो - बहुभाषिक
शिकवा त्याला
जीवनात येणारी संकटं
येतात आपल्याला शिकवण्यांसाठी
विवेक आणि धाडसानं सामोरं जावं
संकटाचा गुंता सोडवण्यासाठी
जाता-जाता सांगा त्याला,
पाण्याची धार उंचावरून सोडली
तरी ती येते जमिनीवरच
पण अग्नीच्या ज्वाळा
जमिनीवरून जातात आकाशाच्या दिशेनं
उंचऽ उंचऽऽ उंचऽऽऽ
म्हणून आपले विचार
नसावे पाण्याच्या धारेसारखे
तर ते असावे
उंच जाणार्या अग्नीच्या ज्वाळेसारखे
जमेल तेवढं नक्की करा -- कधितरी
मला माहित आहे
ह्या सर्व गोष्टी
एकदम नाही शिकविता येणार
पण साधून प्रसंगावधान
कधितरी -- केव्हातरी
सांगा त्याला ,
ध्येयवादी माणसं विलाप करत नाहीत
तर ती संकटात संधी शोधतात
म्हणूनच त्यांच्या हातून
प्रेरणादायी इतिहास घडतात
म्हणून म्हणावं त्याला,
जमिनीवर सरपटणार्या गांडुळापेक्षा
आकाशात भरारी घेणार्या
पक्षांचा विचार कर
आणि ते ब
ळ
निर्माण करून स्वतःमध्ये
अन हो स्वयंभू !
कारण,
याचना करून प्राप्त करणं
हे लक्षण आहे आपल्यातल्या दुबळेपणाचं
मात्र इच्छित ध्येय उराशी बाळगून
त्या रोखानं केलेल्या वाटचालीत
अपयश आले तरी
तो ठरतो पुरुषार्थ
बाणवा त्याच्या अंगी,
पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेणार्या
अर्जूनाची ------ एकाग्रता
थाॅम्स आल्व्हा एडिसनची ---- जिद्द
स्वातंत्र्य समरात लढणार्या सैनिकांची --- देशभक्ती
एकलव्य आणि कर्णाची --- गुरुभक्ती
श्रावणबाळाची ----- मातृ-पितृभक्ती
गंगापुत्र भिष्माची ------ गंभिरता
भगवतगितेचे निर्माण करणार्या कृष्णाची --- कुटनिती
अन सोबतच कळू द्या त्याला ,
अश्वस्थाम्याच्या मरणाची वार्ता ऐकून
लक्ष्य विचलित झालेल्या
द्रोणाचार्याची चंचल अवस्था
धृतराष्ट्र आणि दुर्योधनाचा ---- सत्तालोभ
आणि त्यामधून घडलेलं ----- महाभारत
कंस आणि रावनाचे अमानुष ---- अत्याचार
गुरु शुक्राचार्याचेही नं ऐकणार्या
असुरांचा इतिहास
खळाळत वाहणार्या झर्यांचा ----- उताविळपणा
म्हणजे समजेल त्याला
चांगले आणि वाईटातला फरक
जमलं तर सांगा त्याला,
उपवनात उमललेली फुले
जशी आपल्यातील सुगंधाची
उधळण करून
संपूर्ण वातावरण सुगंधीत करतात
तसा तू तुझ्या
किर्तीचा सुगंध दरवळू दे ------ जगतामध्ये
पण म्हणावं त्याला
किर्तीने होरपळून जाऊ नको
अन खचू नको अपयशानं
वेळात-वेळ काढून सांगा त्याला,
संचय जरूर करावा
पण कांचनमुलवादी होऊ नको
एकवेळ कांचनमुलवादी झाला तरी चालेल
पण स्वाभिमान गमावू नको
स्वतःच्या नजरेतून पडू नको
प्रत्येक शरीरात एक आत्मा आहे
पवित्र मन व पवित्र विचारांनी
अविनाशी आत्म्याचा विकास कर
माफ करा गुरुजी !
माझं मागणं फार मोठं आहे
अगदी ज्ञानेश्वरांच्या पसायदानापेक्षा
पण पहा....... जेवढं शक्य आहे
तेवढं अवश्य कराच
कारण,
चौदा-पंधरा किलो वजनाचा
मासाचा गोळा, माझ्या काळजाचा तुकडा
केला आहे तुमच्या स्वाधीन
त्याच्यावर योग्य संस्कार करून
भारताचा आदर्श नागरिक घडवण्यासाठी