पोवाडा शिवरायांचा
पोवाडा शिवरायांचा
*करूनी पहिले नमन भवानीला*
*तुळजापुरी शिवरायांच्या कुलस्वामिनीला*
*महाराष्ट्रात साऱ्या* *संताला,पूजूनी देवादिकाला*
*शिवराय संतांच्या भूमीत जन्मून*
*टीळा या मातीचा लेवून*
*जाहलो धन्यं-धन्यं आम्ही जनं*
*धरा ही ऐसी पतितपावन*
*गातो महाराष्ट्र अवघा शिवरायाचे* *गुणगानं.......जी.....जी....जी*
अशा या आपल्या पावन महाराष्ट्र भूमीत एक तेजस्वी, पराक्रमी वीर आला उदयास.भोसले घराण्यातील शहाजी राजे आणि थोरमाऊली जिजाऊच्या पोटी हे शिवरत्न आले जन्मास. पुढे ज्याच्या पराक्रमी विजयाचे चौघडे वाजले सह्याद्रीच्या कडेकपारीत . घुमला पराक्रमासह आदर्श ज्याचा या महाराष्ट्र नगरीत.असा आपला शिवबा.....
*फाल्गुन वद्य तृतीयेला*
*शके पंधराशे एक्कावन्नाला*
*शिवनेरीवर वीर नरमणी जन्मासी आला*
*मुक्त कराया मुघलांच्या जाचातून रयतेला*
*पावली देवी शिवाई जिजाऊच्या नवसाला*
*असा रयतेचा वाली महाराष्ट्रासी* *गवसला.....हा..... जी.....जी....जी*
शिवरायांच्या बालपणातील आई जिजाऊंचे संस्कार शिवबाच्या रूजले नसानसात. पडले एकदा शिवबा घोडेस्वारी करतांना आणि जोरजोरात रडू लागले पाहून मासाहेबांना. बाल शिवबास वाटले मासाहेब येतील आपणासी उठवूनी कवटाळण्याला. पण उमजेना कारण असे न घडण्याला.. तेव्हा
*शिवबा स्वतः उठून मासाहेबांजवळ आला*
*म्हणाला का नाही आल्या कुशीत घेण्याला*
*मासाहेब हळूच म्हणाल्या*
*शिवबा तुमच्या पडण्याचे सर्वात जास्त दुःख आम्हाला*
*पण तुम्हास उभारायाचे आहे स्वराज्याला*
*सांभाळूनी आपल्या रयतेला*
*आणि जर गरज भासत असेल आमच्या आधाराची*
*मग कशी नीव उभाराल तुम्ही स्वराज्याची हा..... जी.......जी......जी...*
*अशा प्रकारे स्वराज्याचे बीज शिवबाच्या मनी रुजविले धीराने*
*वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायाने*
*बारा मावळातील सवंगड्यांच्या साक्षीने*
*रायरेशवरासमक्ष घेतली शपथ हिंदवी स्वराज्याची*
*मुहूर्तमेढ रोवली मराठा साम्राज्याची....हा...... जी....जी....जी*
करारी जिजाऊंचे हृदयरत्न, भोसले कुळातील कुलभूषणाने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मुघल साम्राज्याविरुद्ध संघर्षाने, अठरा पगड जातीतील शूर मावळ्यांसह केले मराठा स्वराज्य स्थापन . शिवरायांच्या पराक्रमाचा डंका चहूदिशी वाजला.मुघल साम्राज्यात खळबळ माजला. औरंगजेबाचा मामा औरंगजेबाला म्हणाला,"वो शिवा तो चूहा हैं चूहा मैं उसे यूहीं पकडके लेके आऊंगा।".....तयारीसह पकडण्या महाराष्ट्रात आला महाराजाला.तेव्हा त्याने पुण्यात उच्छाद मांडिला. हि वार्ता समजली शिवरायाला तेव्हा.....
*घेऊन विश्वासू चारशे मावळ्याला*
*लाल महालात शिताफीने राजाने प्रवेश हा केला.*
*शाहीस्तेखानास पळता भूई थोडी झाली*
*झटापटीत शिवरायांनी खानाची तीन बोटे छाटली.........जी....जी....जी*
अशा माझ्या महापराक्रमी शिवरायांच्या यशाचा आलेख दिवसें-दिवस उंचच-उंच चढू लागला. तेव्हा शिवरायांना कैद करण्यासाठी आदिलशाहाची आई बडी बेगम हीने फरमान काढीला. आणा म्हणे कैद करून शिवाजीला. अफजलखानाने चंग बांधिला. हीच अफजलखाना सोबतची प्रतापगडाची लढाई इतिहासात झाली अजरामर. स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून शिवसैन्यापुढे खानाचे सैन्य झाले फरार.
*अतुलनीय पराक्रमाची शौर्यगाथा*
*शिवरायांच्या ठायी नतमस्तक माथा*
*शौर्याने गनिमीकाव्यान
े अनेक गड,प्रांत जिंकले*
*अपुल्या पराक्रमाचे अत्तर मुघलशाहीत शिंपले*
*आदिलशहाच्या आईने फर्मावले*
*कैद शिवाजीस करण्या भले*
*अफजलखानाने विडा उचलला*
*निघाला शिवाजीस मारण्याला.......हा....जी....जी...जी....जी....*
*चिथवाया त्याने महाराजा*
*विध्वंस केला तुळजापूर भवानी मंदिराचा*
*मग महाराष्ट्र दैवत पंढरपूराकडं मोर्चा वळविला*
*महाराजांनी गनिमी कावा खेळ केला*
*खानास घाबरल्याचा आव आणीला*
*तहाचा निरोप धाडीला*
*खानाचा अहंकार सुखविला*
*प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचा दिवस ठरविला....हा....जी.....जी....जी.......*
प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य शामियाना झाला तयार. भेटीचा दिवस उजाडला अखेर. खान शामियान्यात वेळेपूर्वीच हजर. तेव्हा....
*निःशस्त्र ठरले होते भेटायाचे*
*महाराज जाणून होते हेतू खानाचे*
*अंगरख्याखाली चिलखत आणि वाघनखे लपविली*
*सुरक्षेची बडदास्त लाविली*
*मागितले आलिंगन धिप्पाड खानाने*
*आलिंगन देताच महाराजांना दाबले काखेने*
*खानाने महाराजांवर बिचव्यांचा वारही केला*
*सतर्क महाराजांनी वाघनखाने खानाचा कोथळा बाहेर काढीला.....हा जी.....जी....जी....*
*खान ओरडला, "दगा दगा" म्हणूनी*
*अंगरक्षक आले महाराजांवर धावूनी*
*सय्यद बंडाने वार जसा केला*
*जीवा महालाने स्वतःवर झेलला*
*होता जीवा म्हणूनी खरचं वाचला शिवा*
*उधळूनी अफजलखानाच्या डावा*
*दारूण पराभव खानाचा झाला*
*महाराजांच्या यशात मानाचा तुरा रोवला......हा......जी.....जी.....जी*
शिवबास लाभली संतांची शिकवण, मायमाऊली जिजाऊचे मार्गदर्शन. शिवबाने त्यावेळी महाराष्ट्रात पाशवी, क्रूर राजवट असलेल्या मुघल साम्राज्याचा कर्दनकाळ बनून महाराष्ट्रात आपले वर्चस्व केले प्रस्थापित. रयतेला देऊनी मायेचा हात. संत रामदासा आणि तुकारामा महाराजा वंदीती गुरूप्रत. वागूनी संतांच्या शिकवणप्रत....
*संत रामदासांच्या अकरा मारोती मंदिरासाठी*
*अकरा बिघे जमीन वाहीली जनांसाठी*
*संतांनी अंधश्रद्धेचा बाजार हटविला*
*स्वच्छतेचा मार्ग दाखविला*
*भक्ती पंथाचा लळा लाविला*
*दीन-जनांना माणूस शिकविला*
*दावूनी मार्ग सन्नीतीचा साचार*
*बुवाबाजीचा घेतला समाचार....हा ....जी...जी...जी*
अशाप्रकारे शिवरायांनी संतांची शिकवण अंगिकारली आपल्या जीवनी. जनतेची शरीर बलस्थाने सशक्त होण्यासाठी गावोगावी आखाड्यांची स्थापना करूनी.
*जिजाऊंची कडक शिकवण*
*शिवबास दादोजींचे युध्दनीती शिक्षण*
*मुघल साम्राज्यात अस्तित्वाचे ठसे उमटूनी*
*या स्वराज्यातील सिंव्हासनी*
*बैसला परम प्रतापी वीर नरमणी*
*शिवरायांच्या अवताराने झाली धन्य धन्य ही अवनी..........हा.....जी....जी....जी....जी.....*
ऐसे शिवचरित्र ऐकूनच आपण झालो कृतार्थ. शिवरायांच्या पराक्रमाची यशोगाथा लहानांपासून ते थोरांपर्यंत ऐकूनी सार्थ. असा हा जगपालक राजा, रयतेचा वाली माझ्या आता पून्हा होणे नाही.
*शिवचरित्र सदा जगी आदर्श*
*ऐकती सानथोर वर्षानुवर्ष*
*वर्णावा किती पराक्रमाचा हर्ष*
*राजाला माझ्या माणुसकीचा स्पर्श*
*मानूनी मातेसम परस्त्रीला*
*नुरला जातिभेद ज्याला*
*मुघल राजाही ज्यासी भ्याला*
*अवघा महाराष्ट्र मुजरा घाली ज्याला हा.....जी...जी....जी*