मराठीचा संक्षिप्त इतिहास
मराठीचा संक्षिप्त इतिहास
(आर्या)
महाराष्ट्री प्राकृता, मंथने प्राप्त भाषा-नवनीता ।
जनपदप्रिया सुगीता, सप्तशतके हाल-हृदय-अंकिता ।।१।।
(इंद्रवज्रा)
उत्तुंग मूर्ती बनवी सुरेखे ।
त्या भूपतीला स्तविले सुलेखे ।
अद्याप विश्वात चमुंडराया ।
तो ज्ञात आहे विजये कराया ।।२।।
(ओवी - १०,१०,१०,८)
वेदवेदांत ज्ञान अमिता । विवेकसिंधुमाजी चर्चिता ।
संस्कृतस्वर्गीची गंगागीता । प्रगटली ज्ञानदेवी ।।३।।
(वसंततिलका)
म्हाईंभटे सकल चक्रधरास ग्रंथी ।
लीळाचरित्र प्रभुचे प्रसवी स्वकंठी ।
नागेश, विठ्ठल, नरेंद्र, मयूरपंते ।
चोखा, तुका, कवन गात मधूर संते ।।४।।
(भुजंगप्रयात)
मनोरम्य आख्यान ते नैषधाचे ।
हरीकीर्तनी श्लोक पाही मनाचे।
नवा कोश रक्षार्थ काढी शिवाजी।
तयाचे म्हणोनी सुकर्तृत्व गाजी ।।५।।
(अनुष्टुभ)
शास्त्रललित लेखांचे, आज आगार होतसे ।
साहित्यरत्न मोलांचे, मराठीतून येतसे ।।६।।
मराठीचा 'म' गाजेल, तोच अंगात बाणता ।
तो 'म' व्हावा महाज्ञान, मानवता महानता ।।७।।