कवी आणि जंगल
कवी आणि जंगल
शब्दांच्या मळ्यातून
कवितेचे अरण्य फुलविणारा कवी
रमतगमत शिरतो एखाद्या जंगलात
तेव्हा किलबिलत, उडत येतात पाखरे
आणि बसतात त्याच्या खांद्यावर
त्याच्याच कवितेची धून गात
कवीच्या पायाखालची वाटही
त्याचे स्वागत करण्यासाठी
पायघड्या घालते
मखमली गवताने सजलेल्या
हृदयाच्या खिडकीतून
कवी पाहतो जंगलाला
तेव्हा त्याच्या उरात उमलते
हिरवाईने नटलेले रान
कवी जाईल तिथे
हवा गिरक्या घेत नाचू लागते,
बहरलेली फुले गंधाळतात
आणि दुतर्फा लवलवणारी झाडे
पांघरतात आपली मायाळू सावली
कवीच्या शालीन अंगावर
अखेरीस जंगलाचा निरोप घेताना
भावविभोर झालेला कवी
कोरीत जातो काळजाच्या पाटीवर
त्याच्या भावविश्वात बहरलेल्या जंगलाची
एक हळुवार कविता