जीवन रंग
जीवन रंग
कलेकलेने रोज वाढते
आकाशातील चंद्रकला.
तशाच फुलती माणसातही
सुंदर आणि विविध कला (१)
आयुष्यातली कला शोधिण्या
सजग आपली नजर हवी
शोधीत जाता बारकाईने
रोज सापडे कला नवी (२)
जे सुचले ते क्षणी लिहावे,
कथा, काव्य वा असू दे गीत
रेषा रेखीत साकरावे चित्राचे
जुऴवावे गणित (३)
रंग कुुंचले घेऊन हाती
रंग भरावे त्या चित्रात
कधी रेखावा सूर्योदय,
तर कधी फुलावी चांदणरात (४)
भिन्न घेऊनी ललाट लेेेख
आपण आपले वाचत जावे
आणिक चित्रामधले गाणे
जीवनातही गात रहावे (५)
कलावंत तो भोवतीची
सर्व ऐहीके विसरून जातो
पारलौकिक ते अलिंगुनिया
जीवनात धन्यता पावतो (६)
जणू रेषांची सतार छेडीत
रंगधून तो आळवितो
सुरावटीचे धवल चांदणे
निमग्नतेवर अंथरितो (७)