अंधाच्या जगण्यावरचे भाष्य
अंधाच्या जगण्यावरचे भाष्य


नेत्रदीपक गेले विझुनी तेल वात सरली
रंग थवे ये गेले उडुनी कालरात उरली
कशी करू मी जीवन यात्रा नेत्र दीप नसता
घोर सागरी लोप पावली तेजोमय सरिता
नशिबाचा हा खेळ आंधळा, दिठी बळी पडली..१
काल दशानन घेऊन जाता दृष्टी लाडकी सीता
ढाळीत "आत्मा राम" आसवे गात विरह गाथा
सीते वाचून राम कथा ही विलापिका ठरली..२
जरी दीप हे गेले विझुनी स्वप्न मला दिसते
या दुनियेचे रंग रूप मज स्पर्शाने कळते
त्या स्पर्शाच्या दिव्य लोचनी दीपमाळ सजली..३