पहाट
पहाट
चांदण्यांचा सडा विरता विरता,
उतरले तृण-श्वास अंगणी प्राचीच्या l
तसे रुपसी खग षड्जात न्हाले,
गगनलक्षी भरा-या सोनियाच्या l
स्वप्नवत रातीचे गलबत कसे,
बुडे अलगद प्रकाशाच्या सागरात l
पाना-पानांत पाघळले दवबिंदूंचे ठसे,
जसा पितांबर झळके आकाशात l
आर्त गुलाबाची छटा पश्चिमेच्या दारी,
<
strong>अन् केशरी टिळा शुभ्र मेघांवरी l
कुठे मातीच्या कुशीत रान रुजलेले,
जागे झाले तसे पंचानन रुसलेले l
शितल धुन वाजे वा-याची आगळी,
आर्त मधुर राग गाऊनी भुपाळी l
कुजबुज हालचाल होऊ लागे लगोलग,
ऊन्हाचे कवडसे आणती जळी रुपरंग l
चांदण्यांचा सडा विरता विरता,
उतरले तृण-श्वास अंगणी प्राचीच्या l