कोकण
कोकण
आठवांचा पूर येता मनी दाटते, साठते कोकण
हिरव्या-कंच पाचुच्या रानात कसा झरतो,बागडतो श्रावण
अल्लड पायवाटा कशा झिम्मा खेळती मातीशी
रानफुले हर्णीची डुलत गाती संवादी सरींशी
सागर फेसांचे बंध जुळता ऊन्हाशी,झरे काठाशी लवण
हिरव्या-कंच पाचुच्या रानात कसा झरतो,बागडतो श्रावण
निनादते सर, गुंजते राऊळ, श्रावणी सोमवार सजे
कौलारु घर, सळसळे पोफळ, वा-याचे पैंजण वाजे
झावळ्या आडून ऊन्हाचे शृंगार भासे घराला सोनेरी लिंपण
हिरव्या-कंच पाचुच्या रानात कसा झरतो,बागडतो श्रावण
ऊन्हे न्हाऊनी धवल, पिवळी काचोळी नेसला चाफा
दिपल्या क्षणांचा लपत्या सरींचा मृगजळी पक्ष्यांचा ताफा
निर्झर झरझर वाहुनी खळखळ करिती मोत्यांचे शिंपण
हिरव्या-कंच पाचुच्या रानात कसा झरतो,बागडतो श्रावण