रोवणी
रोवणी
चला ग सयांनो जाऊया
रोवणी रोवायला शेतावर,
खोचून शेला कमरेला
पात धरूया ग चिखलावर.
पेंडी येताच हातात
खोलून ती चिखलावर,
एकेक रोप बोटाने धरून
रोवू त्याला चिखलात खोलवर.
सख्या सयांनो सूर लावा
पाथीवरच्या गाण्यांची,
मागेपुढे सुरात सूर चढवून
पात संपवू रोवण्याची.
पाऊस पडताच अंगावर
मोरे मेनकापड पाठीशी घेऊया,
माध्यान्ह आहारी करण्यासाठी
तिथल्याच पाऱ्यावर बसूया.
झपझप करूया ग रोवणी
संपवू साऱ्या पेंड्या दिवसाला,
लौटूया घराकडे सांजवेळी
दिलेली मजूरी घेऊन हाताला