घे भरारी
घे भरारी


तनमन अपुले एक करूनी
सौख्य फुलव तू सदनी
पंख लेऊनी आकांक्षांचे
घे भरारी उंच गगनी
मागे तुझिया काय राहिले
नको पाहू गं वळून आता
तुला हवे ते पुढेच आहे
येईल तुजला कळून आता
ध्यानामध्ये सदैव असूदे
धैर्य धरोनी कार्य करावे
कर्तृत्वाने मिळे यशश्री
प्रयत्न अपुले करीत जावे
कणखर बाणा तुझा असावा
तुझीच गाथा ऐकू यावी
तुझ्या यशाची शुभ्र तारका
आकाशावर उगवून यावी
या खडतर वाटेवरती
तुला जायचे क्षितिज भेदूनी
पुढे पुढे चाल सखे तू
शिखरावर नजर रोखूनी