प्राणी दोस्त
प्राणी दोस्त
जिराफदादा,जिराफदादा
लहान तुमचे कान,
हलते बघा कशी
लांब लांब मान.
कावळेदादा,कावळेदादा
तुमच्या सारखा विरळा,
मान वाकडी करून बघता
डोळा तुमचा तिरळा.
चिऊताई,चिऊताई
सारखी चिवचिव करता,
मात्र दाणे टिपताना
टूण टूण उड्या मारता.
मासेभाऊ,मासेभाऊ
किती तुमचे रंग
सारखे सारखे तुम्ही,
पाण्यामध्ये दंग.
मनीमावशी, मनीमावशी
उंदीर कसे खाता
दूध चोरून पिताना,
डोळे मिटून घेता.
मोरोबा, मोरोबा
थुई थुई करा ना,
आला बघा पाऊस
पिसारा फुलवा ना.
माकडदादा,माकडदादा
बोर खा थोडी,
झाडावरून खाली
मारता का उडी.
खारुताई खारुताई
किती तू वेंधळी,
इकडून तिकडे पळताना
शेपूट तोल सांभाळी.
हत्तीदादा हत्तीदादा
किती मोठी सोंड
सुपा एवढे कान,
आणि बाप्पासारखं तोंड.
गायमावशी,गायमावशी
हम्मा हम्मा करते,
स्वतः गवत खाते
बाळा गोड दूध देते.
कुत्रेदादा कुत्रेदादा
शेपूट तुम्ही हलवता,
भूभू सारखे करीत
घर तुम्ही सांभाळता.
असे सगळे प्राणी
असती सगळे मस्त,
त्रास त्यांना द्यायचा नाही
सगळेच आपले दोस्त..
