मलाच नडले माझे मी पण
मलाच नडले माझे मी पण
बांधायचंच झालं तर घर बांधावं वाळूचंच ...
निर्मितीचा आनंदही मिळतो नि मोडल्याच दुःखही नसत ...
तेच तेच दुःख उगाळणे ,जुने मढे उकरून काय हाशील ?
कोळसा कितीही उगळावा तरी काळाच ...
विश्वासाचे हमखास खांदे , कधी कुणाचा आसरा झाले
डाव साधाया मुखवटेच केवळ क्षणिक सारे हासरे झाले...
दूर -दूर त्या तिथे जमिनीवर जणू नभही टेकले
तो सूर्य , ते चंद्र तारे नव्हतेच आपले कधीही ...
मृगजळ का कधी हरिणाची तृष्णा भागवते ?
हरिणा कधी का कळते कस्तुरी तर आपल्याच नाभीत ?
अज्ञानापायी अविरत , अखंड ती धावतच असते
नाहीच कळले आश्वासक हात केंव्हा पसार झाले...
वेळ गेली तेंव्हाच कळले आश्वासक वचन कसे फसवे झाले
आज उमगले , झाले गेले विसरून जावे , पुढे - पुढे चालावे
कधी ना कळले , कोण मेले कोणासाठी रगत ओकून
कशास बसावे कुणी, कुणासाठी उगाच पाल ठोकून ....
अवघड रस्ता , प्रवास खडतर मान्य परंतु ...
चल रे दोस्ता ! व्यर्थ न चिंता तुझा तूच हो दिलासा
दोष कशाला कुणास द्यावा ?, मलाच नडले माझे मी पण
सापडेलहि स्वप्नातला गाव अन्यथा आहेच रस्त्याला रस्ते मिळत जाणारे...
