माय
माय
किती झिजली झिजली माय मही मह्यासाठी
पुन्हा पुन्हा जल्म घ्यावा वाटे मला तिच्या पोटी ।।धृ।।
तळहाताच्या फोडाची कधी पर्वा नाही केली
मह्या जीवासाठी सदा जीव तिचा वरखाली
हात मायेचा रांगडा सदा फिरे मह्या पाठी ।।१।।
काम करता शेतात जव्हा पाठीशी बांधते
राणी लक्षुमी झाशीची तव्हा मला ती भासते
सांगे जीजाऊ बनून शूरवीरांच्या त्या गोठी ।।२।।
दिनरात ती राबते, साऱ्यां साठीच रांधते
एका पिरमाच्या धाग्यांनं अख्ख्या घराला बांधते
जल्मोजल्मी सोडवेना तिनं बांधलेल्या गाठी ।।३।।
कधी रुतला चुकून काटा मह्या पायामंदी
काळजाचं पाणी पाणी उभं तिच्या डोळ्यामंदी
माय रडते पडते मला धरूनिया पोटी ।।४।।
जगा मंदी हिंडतांना मान पान मला मिळे
मह्या माईचं काळीज कसं कवतिकानं फुले
पडे कवतिकाची थाप मायचीच मह्या पाठी ।।५।।
मह्या मायीचंच सदा मह्या पाठी पाठबळ
रूप देवाजीचं कळं मला मह्या माय मुळं
मागणं हे देवापाशी नांव तिचं राहो ओठी ।।६।।
