माझ्या आईचा संसार
माझ्या आईचा संसार
झाडलोट परसात, भल्या पहाटे उठून..!
सडा सारवण छान, शेणामातीने लिंपून..!
दिसे सुंदर अंगण, आरशा सम उठून..!
असा संसार आईने, केला सारून लिंपून..!१!
अंगणात दारमोऱ्ही, तुळसाई पुढे भुई..!
एक एक तो ठिपका, रेखाटी रांगोळी आई..!
रेषा ठिपके जोडून, सजली सुंदर नक्षी..!
असा संसार आईने, रंगविला बहू अक्षी..!२!
कमरेला ती घागर, कळशी भरली डोई..!
आणे जाऊन नदीला, पाणी अनवाणी आई..!
एका एका खेपेला, रांजन भरत जाई..!
असा संसार आईने, भरभरून ती वाही..!३!
चिंधी जोडून चिंधीला, मऊ गोधडी शिवली..!
ऊब मायेची तिच्यात, तिला तोड ना कसली ..!
रंगा रंगाचा कपडा, सुई दोऱ्याने शिवला..!
असा संसार आईने, नीटनेटका जोडला..!४!
दारी तुळसाई माई, देव्हार्यात ती समई..!
सांच्यापारी अंगणात, पाजळीले दीप आई..!
एक एक दिवा तेजे, जाई प्रकाशूनी घर..!
असा संसार आईने, उजळीला मण भर..!५!
