मेघराज
मेघराज
मेघराज गरजले,
मुक्तछंद बरसले.
थेंब टपोरे टपोरे,
अंग अंगणी नाचले.
गार हिरवा पदर,
भुई सोडुनी मोकळा.
धरणीच्या प्रीतीसाठी,
झाला मेघराज भोळा.
वाट वाकडी करून,
अंग मोकळं सोडून.
नदी आली पाहुणी,
जणू माहेरी परतून.
कवतिक किती माय,
सुवासिन आली दारा.
ओटी भरूनिया तिची,
होई स्वागत माहेरा.
शेता शेतात जाहली,
आज बीजाची पेरणी.
रान टोकून पोकून,
झाली पहिली बोहनी.
लव कुश जन्म घेती,
सीता मातेच्या पोटी.
तसा अंकुरेल कोंब,
हिरव्या आईच्या पोटी.
#गंगाशिवकापुत्र
