सखे माझा गाव गं...
सखे माझा गाव गं...
निळाशार नभाखाली
हिरवागार डोंगर गं..!
पायथ्याशी शेतात माझ्या
सर्जा राजाचा नांगर गं..!
डोंगर कुशीत वसतो
सखे माझा गाव गं..!
एकदिलाने राहतो इथं
रंक आणि राव गं..!
नागमोडी तरी संथ
नदी माझी माता गं..!
नदी तीरावर चरे रान
वासरू गोमाता गं..!
गार वारा उंच माडा
उन्हासंगे खेळतो गं..!
वरखाली बनातूनी
सळासळा वाहतो गं.!!
डोंगर माथ्यावर तिथं
शंभु महादेव बसतो गं..!
पायथ्याशी मारुतीराया
हाती द्रोणागिरी धरतो गं..!
देवळाच्या बाजूलाच
वाहतो मंजुळ झरा गं..!
पाठीमागे दिसतो भारी
आंब्याला फुलोरा गं..!
शेता शेतातून डोले
हिरवा साळ धान गं..!
किती गोड माय माझी
अन् जन्मभूमी महान गं..!
बळीराजा चाले माझा
गातो शेतीचं गाणं गं..!
गुणगान गाता हारते
भूक तहान भान गं..!
