कंदील
कंदील
दिनभर राबून शेतात,
जेंव्हा काळकुट्ट व्हायचे आकाश
शिकाया माझ्यासंगे असायचा,
तेंव्हा जीर्ण कंदीलाचा प्रकाश
मित्र सारे शाळेतले,
कुल्फी चॉकलेट घ्यायचे
इच्छा मारुनी पैसे आमचे,
घासलेट मध्ये जायचे
त्याच्या प्रकाशात आई काम करायची,
बहीण बनवायची भाकरं
कंदीलास आमचा चंद्र मानणारी,
आम्ही रानातली पाखरं
काचेवर जशी जशी त्याच्या,
काजळी चढायची
शिकायची भूक माझी,
क्रमाक्रमाने वाढायची
जीवनात प्रगती करता करता,
चांगले वाईट कळावे लागते
गरिबीचा अंधार दूर कराया,
मनातल्या कंदीलासही जळावे लागते
रस्ता जीवनातला असो वा,
काळोख्या रातीचा
आभार आपण जरूर मानावा,
कंदीलातील वातीचा
