जन्मोत्सव वसुंधरेचा..!
जन्मोत्सव वसुंधरेचा..!
कवेत घेऊ वसुंधरेला
जीवन वाचवू ह्या जीवांचे
गाणे होऊ या पाखरांचे
मोल जाणू या ह्या वृक्षांचे....
दगावले कित्येक बंधू
भगिनी आजोबा आजी पहा
नाही मिळाला प्राणवायू
तयास पुरेसा जगण्या पहा....
चला हिंडू या रानोमाळी
पडीक भुईचे करु या सोनं
पशू पक्ष्यांचं सुखकर होईल
आपुल्या श्रमातूनी सुंदर जीणं
पदोपदी अन् दुतर्फा मार्गी
नवजीवन फुलवू वृक्षांचे
पाऊस पाणी मुबलक मिळेल
जगणं होईल सुंदर सगळ्यांचे.
नवी पालवी नवी आशा ही
नवी चेतना नवी भरारी
नवी उमेद नवा आदर्श
नवी प्रेरणा नवी उभारी....
बीज रोवू या नव्या स्वप्नांचे
हिरवी वसुंधरा करु या चला
नववधूपरी लाजेल धरणी
रुप नवे ते पहा जरा..
वाहिल वारा झरे वाहतील
नद्या आनंदी ओढे वाहतील
धूप मृदेची थांबेल क्षणोक्षण
समाधानाचे स्वर गुंजतील...
पुन्हा एकदा वसुंधरेचा
जन्मोत्सव करु साजरा
हिरवा शालू पुन्हा दिसेल
हासरा, लाजरा अन् गोजिरा.!
