हसण्यावर घेऊ नका
हसण्यावर घेऊ नका
इवलुशा विषाणूने कशी केली बरबादी
हसण्यावर घेऊ नका गोष्ट नाही साधी
लई दिवसांन जमलं मित्राचं लग्न
मध्येच आलं हे कोरोनाच विघ्न
वर्षभर घरात ठेऊन कुजली खादी
हसण्यावर घेऊ नका गोष्ट नाही साधी
पहाटेच लग्न लागले वाजला नाही सूर
पाहुण्यांना ठेवलं होत गावापासून दूर
मान पान सोडून झाले नवरदेव राजी
हसण्यावर घेऊ नका गोष्ट नाही साधी
फिरतांना रस्त्यावर पोलिसांनी धुतलं
बसता उठता येत नाही जुनं दुखणं उठलं
पडून पडून पलंगावर पापड झाली गादी
हसण्यावर घेऊ नका गोष्ट नाही साधी
शहरातून येवू लागले पेशंट म्हणून असले
गावाकडचे डॉक्टर शेतात जाऊन बसले
राजा वजीर सुखरूप फुकट मेली प्यादी
हसण्यावर घेऊ नका गोष्ट नाही साधी