STORYMIRROR

Ganesh Punde

Others

2  

Ganesh Punde

Others

माय माझी

माय माझी

1 min
845

कुळ उद्धारले तिने माय माझी साधी भोळी

महाग्रंथ माय माझा काय लिहू मी चारोळी


मोठा दुष्काळ पाहिला कधी राहिली उपाशी

झोपवून मुलाबाळां ती जागी बसली उशाशी

मूठभर भातासाठी उखळात कांडे साळी

कुळ उध्दारले तिने माय माझी साधी भोळी


मुलं बाळ शिकवली सांभाळून नातीगोती

पैसे सोने नाणे गौण माणुसकी तिला मोठी

दुःख मनामध्ये सारं अंगावर काकण चोळी

कुळ उध्दारले तिने माय माझी साधी भोळी


जन्म घालवला तिने सुखी संसाराच्या पाई

दोन साहेबांची आई गाव करतो नवलाई

तिच्या पुण्याईने भरली सुखी जीवनाची झोळी

कुळ उध्दारले तिने माय माझी साधी भोळी


काहूर मनांत तरीही माय घेऊन चालली

तिच्या मनातील खंत नाही कुणाला बोलली

बाप हरवला झाली तिच्या स्वप्नांची होळी

कुळ उध्दारले तिने माय माझी साधी भोळी


माय उच्चारतो तेव्हा पाणी डोळ्यांत साचते

सारं असून का जवळ आतून मनाला बोचते

जीवनात रंग भरली सजवली ही रांगोळी

कुळ उध्दारले तिने माय माझी साधी भोळी


सांभाळली माय मला झाली यशोदा माऊली

गर्द दुःखाच्या उन्हांत होती मायेची सावली

संजीवनी झाली माय माझ्या संकटाच्या काळी

कुळ उद्धारले तिने माय माझी साधी भोळी


Rate this content
Log in