होता माझा....
होता माझा....
होता माझा बालपणीचा,
सुंदरसा भातुकलीचा खेळ.
हया धकाधकीच्या संसाराशी
जमेना त्याचा मेळ...
खेळासाठी आई देई
दाणे आणि गुळ,
सोबत त्याच्या मातीची,
बोळके आणि चूल......
आई सारखी देवपूजा
अन् नंतर स्वयंपाक,
स्वतःच व्हावे बाबा
आणिक जावे ऑफिसात...
बाहुलीच्या वेणीफणीत
वाटे मोठी गंमत,
गुंडाळून आईची साडी
खेळास येई रंगत...
नव्हती तेव्हा घाई गर्दी
नव्हता कसला तान,
वाटे सारे मुबलक आहे
नव्हती कशाची वाण...
अज्ञानाचे सुख ते गेले
होवून सज्ञान,
संसाराच्या ऊन सावलीत
आले वास्तव भान...
