गुढी उभारु चला
गुढी उभारु चला
नववर्षाची पहाट झाली,क्षितिजी त्या मग लाली फुलली
नवोन्मेषे,उत्साहाने,नवसंकल्पाची गुढी उभारु चला
कष्टक-याला देऊं भाकरी
सुशिक्षिताला मिळो चाकरी
नीतीमत्तेच्या व्यवहाराची गुढी उभारु चला
सत्तालोलुप संधिसाधूंनी
सत्तास्थाने दूषित केली
मरणोन्मुख त्या लोकशाहीला,नवसंजीवनी देऊ चला
रामराज्य ते दूर राहिले
शिवशाहीचे बुरुज भंगले
दिशाहीन या युवाशक्तीला नवप्रेरणा देऊ चला
महागाईचा असूर माजला
भ्रष्टाचारी आदर्श झाला
जाळुनि,पुरूनि भ्रष्टाचारा,सचोटीची ती गुढी उभारु चला
सुविचारांची बाग फुलवू या
जातियतेला थारा नच द्या
भारतीय ही जात आमुची,माणुसकीचा धर्म जागवू चला
नववर्षाच्या शुभेच्छांसह,नवसंकल्पाची गुढी उभारु चला
