विनवणी
विनवणी
नको रूसू रे पावसा
कां रे धरिसी आकसा ....
कृष्णमेघांची ती दाटी
कुठे गगनी दिसेना
दूर क्षितिजावरती
वीज जरा चमकेना
वाट पाहूनि धरणी, कसा सोडीते उसासा .......
रणरणत्या उन्हाने
अंगी काहिली तापती
शोष कंठांना पडला
धारा घामाच्या वाहती
आतां किती शिणविसी, शिडकाव रे गारसा........
माय अधिर ही झाली
तुज कवे घ्यावयाला
तरु, लता पक्षीगण
उत्सुकले स्वागताला
चाहूलही यावी कानी, साद घालू दे पावशा..........
किती धीर तो धरावा
प्राण कासावीस व्हावा
भेगाळल्या शरीरात
कुठे ठरेना ओलावा
अंत किती तो पाहसी, येरे जीवींच्या राजसा.........
नको रुसू रे पावसा.......
