छत्री
छत्री
'छत्री' मधल्या अक्षरांमध्ये मन माझे अडकून राही
प्रश्न मनाला पडता उत्तर शोधणेच आले काही
'छ' कडे त्या वळून पाहता नजरेत येतो आकडा 'सहा'
पुढे पूज्य ते अडकवलेले उभ्या अशा काठीत पहा
म्हणजे 'छ' हा साठी आणि निवृत्ती ही दावितसे
पुढे 'त्री' तून 'तीन' खुणावी आधारासाठी की कसे?
सहापुढे हा तीन आणता जमली की हो जोडी
सुखदु:खांना वाटून घेते ही हास्यातील गोडी
'छ' मधील साठीसाठी ही त्रयींची खेळी
आजोबांसह आजी नातवंडे खेळती खेळीमेळी
छत्र जयांचे या घरट्यावर घालती पाखर प्रेमाची
छत्री मधूनी मैत्र साधती गम्मत '63' आकड्याची
