हरवलेले शब्द
हरवलेले शब्द


शब्द असे लबाड असतात
नाचत नाचत पुढे येतात
हातात हात घालून येतात
भोवती पिंगा घालीत राहतात
शब्द असे लबाड असतात
पदर घट्ट धरून ठेवतात
कडे घेण्या हट्ट करतात
हळूच मनाचा ताबा घेतात
तळकोपरे धुंडत राहतात
शब्द असे खट्याळ असतात
मनामधून उतरून खाली
कागदावरती जाऊन बसतात
कवितेच्या प्रांतात मग
घरच्यासारखे वावरू लागतात
शब्द असे लडिवाळ असतात
आपण असावे कधी गुंग
कामामध्ये अगदी दंग
तेव्हाच नेमके घ
ेऊन रंग
समाधि आपली करतात भंग
मनात शिरून बसण्यासाठी
प्रयत्न आटोकाट करतात
शब्द असे हट्टी असतात
मन जेव्हा असते व्यस्त
विचारांनी असते त्रस्त
व्यग्र व्यस्त मनाची मग
कवाडे ना त्यांना उघडत
शब्द बसतात तेव्हा रूसून
कोप-यामध्ये जातात दडून
पुन्हा शोधू म्हणता मात्र
येत नाहीत पुन्हा जुळून
अशा हटवादी शब्दांनी
मनात मग माजते काहूर
अन् मागे मात्र उरते
फक्त एक हुरहूर
फक्त एक हुरहूर