संस्कार
संस्कार


' संस्कार '
असूनि मालक राहत्याघरी मिंधा की झाला
उन्मळत्या आधारवडासह पिंपळ थरथरला
जुन्या, जाणत्या मर्यादेचा भंग आतां जाहला
कौलारू घरट्यांच्या जागा बंगल्यांनी घेतल्या
संस्कृतीचा वारसा घराचा वृध्दाश्रमी जाहला
चिमण्या बाळांच्या मायेचा कोषचि हरवून गेला
पैशाची वाढली मग्रुरी, पैसा भरतो पाणी
ना मायेचा गंध तिथे, ना येते डोळा पाणी
सांजवात अन् शुभंकरोती यांच्याशी ना गट्टी
संस्कारांसह परंपरांना दिली सोडचिठ्ठी
तरी कुठेतरी मनास वाटे संस्कारांची आस
शोधित फिरती संस्कारांची केन्द्रे आसपास
संस्कारांची खरी शिदोरी आजा -आजी घरची
निगुतीने ती जपणूक करिती दुधावरील सायीची
आजी-आजोबांसवे नांदती कितीक नातीगोती
त्याच घरांच्या संस्कारांची असती पक्की जोती