कलावंत
कलावंत
आळस झटकून निसर्ग उठला
हाती होता रंगांचा कुंचला
इकडे तिकडे कागद शोधत
मनात चित्र रंगवू लागला
आभाळाने झटकन् केली
त्याच्यापुढे कोरी पाटी
कुंचला फिरू लागला आणि
करू लागला रंगरंगोटी
मनामधले रंग आता
उमटू लागले कागदावर
तोच अचानक काळ्या ढगाने
लक्ष वेधले स्वतःवर
त्याच्याच पोटात टोचून त्याने
धुवून घेतली पाटी छान
सारे मनासारखे जमताच
हसून हलवली अपुली मान
एकएक करून रंग आता
उतरू लागले झराझर
कुंचल्यामधून सांडू लागले
थेंबाथेंबाने पृथ्वीवर
उघड्या बोडक्या झाडांवरती
आला सुरेख लालसर रंग<
/p>
नवथर पोपटी रंगाचा
पानांना घडू लागला संग
डोंगरांनाही जाग आली
सजले घालून हिरवा कोट
शुभ्र नाच-या वेल्हाळांनी
हळूच धरले त्यांचे बोट
निळी जांभळी पिवळी पांढरी
रानफुलेही लागली सजू
काळ्या काळ्या धरतीवरती
रांगोळ्याही लागल्या नाचू
नाचत लाजत फुलपाखरांनी
मागून घेतले भरपूर रंग
खुशीत येऊन निसर्गाने
रंगवून टाकले त्यांचे अंग
पाखरांनीही किलबिल करीत
साधून घेतले अपुले काम
पंख पसरून भरारी घेत
कलाकाराचा राखला मान
मुक्तपणे उधळून टाकले
पोतडीतले सारे रंग
चराचराला करूनी सुंदर
रंगामध्येच झाला दंग