स्वयंवर
स्वयंवर


स्वयंवर
लोकशाहीशी जडले नाते या भारतभूचे
स्वयंवर सत्तासुंदरीचे, मांडले सत्तासुंदरीचे !!
हातमिळवणी करुनी आले , निवडून जे प्रांती
फुका घोषणा धनही ओतले कशास ना भ्रांती
शब्द खड्ग, निंदाशर ,तोफा प्रसंग युद्धाचे !!
नवनिर्वाचित रथी-महारथी राजधानी पातले
सत्तासुंदरी अंकित करण्या मोर्चेही बांधले
मनीमानसी स्वप्न रचावे पाणिग्रहणाचे !!
बजबजपुरी माजली चहुकडे सत्ताकांक्षींची
तिलांजली तत्त्वांना देऊनी मुक्ति धोरणांची
राजकारण चाले तेथे सौदेबाजीचे !!
कुणी करिती नेतृत्व गटाचे अति सावधतेने
कुणी मांडिती गणित यशाचे 'जर-तर ' अटीतटीने
वरमाला ही घालू कुणाला , संभ्रम सुंदरीचे !!