भावभोळा विठ्ठल
भावभोळा विठ्ठल
आषाढ महिना । पंढरीची वारी
आस लागे उरी । भक्तांचिया (१)
सरला कोविड । तुझिया कृपेने
भक्त उत्साहाने । माहेराला (२)
हरीनाम गर्जे । पंढरीच्या वारी
भेटे उराउरी । वारकरी (३)
पालख्या पंढरी । आनंदे येतील
भजने गातील । एकमुखे (४)
भीमातीर भरे । आनंदा उधाण
भेटीलागी आण । बा विठ्ठला (५)
मागील उणीव । निघेल भरुन
आनंदे गाऊन । भजनांसी (६)
भेटेल भक्तांसी । विठाई माऊली
संकट साऊली । दूर करी (७)
भोळा भक्तीभाव । भक्तांचिया मनी
जाण मनोमनी । बा विठ्ठला (८)
भावाचा भुकेला । भक्तीची तहान
विठ्ठल महान । शब्दातीत (९)