भारतीय...!
भारतीय...!
वर वरची नाटक सारी
सगळे मणी एकाच माळेचे असतात
दिसतात तसे नसतात
म्हणून भोळी माणसं फसतात ...
कोणी नाही हिरवा
कोणी नाही केशरी
कोणी नाही पांढरा
कोणी नाही निळा....
यांचा आहे समाजसेवेचा
एकच अजेंडा
अंगा खांद्यावर खेळवायचा भ्रष्ट धंदा
धरुनी मलिन मनाचा काळा झेंडा....
काळ्या रंगाची अनेक रूपे
काळे मन,काळे जन,
काळे धन, सुवर्ण सन
काळे सारे नंबर वन...
काळे काळजाचे गुंड गण
राजकारण यांचा नित्याचा सण
करू म्हणती एकजुटीने सारेजण
भ्रष्ट्राचार बक्कळ नित्य मण मण..
पण आपण
हातात धुरा धरूया एकीची
शपथ घेऊया नेकीची
राहुद्यात बाजूला नालायक बाकीची
ज्योत पेटवू देशभक्तीची
दाखवुया चुणूक आपल्या शक्तीची
कोण म्हणत देश रंगात वाटला
कोण म्हणतं देश धर्मात वाटला
नाही बाबांनो देश नाही वाटला
फक्त एकीचा आहे सदरा फाटला....
चला सप्तरंगांनी
सदरा एकीचा पुन्हा विणूया
तिरंग्याची शान जगतास
पुन्हा एकदा दाखवूया....
एकच रंग एकीचा
एकच रंग नेकीचा
एकच रंग स्नेहाचा
एकच रंग तना मनाचा रक्ताचा...
ना धर्म ना जात
एकची सारे आपण
अद्वितीय या विश्वात
वसा घेउनी सहिष्णुतेचा
भारतीय आम्ही
बंधुभाव दाखवुया जगतास..!
