आदिवासी
आदिवासी
चला जंगल झाडीत जाऊया
आदिवासी संस्कृती पाहूया।।धृ।।
घरे त्यांची कुडा मातीची
कौले, गवत छपरावरती,
सेणामातीचे सारवण घरी
अवलंबून सदा निसर्गावरती.
चला जंगल झाडीत जाऊया
आदिवासी संस्कृती पाहूया।।1।।
गोटूल आहे श्रध्दास्थान
खऱ्या संस्कृती चे मिळते ज्ञान,
ढोल तिरबूळी वाद्य ऐकता
उडून जाते साऱ्यांचे भान.
चला जंगल झाडीत जाऊया
आदिवासी संस्कृती पाहूया।।2।।
जावे आदिवासीच्या लग्नाला
सहभागी होण्या विविध उत्साहात,
गाण्याच्या मैफिलीत रममाण होऊन
अवघी रात्र काढू वधूवर करण्यात.
चला जंगल झाडीत जाऊया
आदिवासी संस्कृती पाहूया।।3।।
नको त्यांना फँशन अंगावरती
जल, जमीन, जंगलच सोबती,
साधी राहणीची भोळी भाबळी
आचरण पुरेसे जगण्यापुरती.
चला जंगल झाडीत जाऊया
आदिवासी संस्कृती पाहूया।।4।।
