धनु कोष्ठक (एक अंश)
धनु कोष्ठक (एक अंश)
(एक अंश)
लेखक: सिर्गेइ नोसव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
सन् दोन हज़ार अमुक-अमुकच्या फेब्रुवारींत (20**च्या नंतरची संख्या कोणाला आठवूं शकते?) : ही त्यावर्षीची गोष्ट आहे, जेव्हां भयानक हिमपाताने जानेवारीतंच मागच्या वीस-तीस वर्षांचं रेकॉर्ड तोडलं होतं.
काल शुक्रवार होता, आठवड्याचे दिवस संपलेत, पण ट्रेन चालतेच आहे, आणि कपितोनवच्या डोक्यांत प्रस्तुत क्षणाच्या परिस्थितीचं चित्र आकार घेतंय.
हा आहे स्वतः कपितोनव. एका मिनिटापूर्वीच तो आपल्या कुपेतून बाहेर निघालाय. ‘बोलेरो’चं रिंगटोन वाजूं लागतं आणि तो खिशांत मोबाइल शोधतोय.
हा राहिला मॉस्को-टाइम.
16.07
ही आहे ऑर्गेनाइज़िंग कमिटीची ओल्या.
“नमस्ते, एव्गेनी गेनादेविच. आमचा माणूस तुम्हांला शोधू नाही शकत आहे. तुम्हीं, खरं म्हणजे, कुठे आहांत?”
“मी, खरं म्हणजे, ट्रेनमधे आहे.”
“तर मग बाहेर कां नाही येत आहे?”
“कारण की मी प्रवास करतोय.”
काही क्षणांसाठी तिकडच्या ओल्याचं बोलणं बंद होतं. कपितोनव शांत आहे – तो गैरसमजांसाठी तयार आहे. कॉरीडोरच्या शेवटी लावलेल्या इलेक्ट्रोनिक-बोर्डवर आता वेळ नाही, तर तपमान दाखवण्यांत येत आहे -110 .
ठीक आहे. मॉस्कोपेक्षा जास्त थण्डी नाहीये.
कुपेला खूपंच तापवण्यांत आलंय.
“माफ़ करा, तुम्हीं कुठे जातांय?”
आनंदाची गोष्ट आहे. तो जातो कुठे आहे?
खिडकीच्या बाहेर एक दोनमजली इमारत डोकावंत होती, जी जमिनीपर्यंत लटकलेल्या बर्फाने झाकलेली होती. आणि मग पुन्हां – झाडं, बर्फ, झाडं.
“पीटरबुर्ग, ओल्या. सेंट-पीटरबुर्ग.”
“पण ट्रेनतर केव्हांच आलेली आहे. तुम्हांला घ्यायला रेल्वे-स्टेशनवर गेले आहेत.”
“असं कसं? मला तर लादोझ्स्की स्टेशनवर पोहोचायला अजून अर्धा तास लागेल. जर ट्रेन वेळेवर असेल तर.”
“थांबा, पण लादोझ्स्की स्टेशनवर कां?”
“तर मग कोणत्या स्टेशनवर?”
“मॉस्को स्टेशनवर.”
“ओल्या, लक्ष देऊन ऐक! काल तुम्हींच मला फोन करून सांगितलं होतं की “सप्सान”1चं टिकिट मिळंत नाहीये, पण जर मला दुस-या दिवशी पोहोचायचं असेल, तर अद्लेरहून येणा-या ट्रेनमधे टिकिट ‘बुक’ करूं शकतो. तुम्हीं विसरलां कां? मी कज़ान रेल्वे स्टेशनहून ट्रेनमधे बसलो, लेनिनग्राद स्टेशनवरून नाही, आणि सगळ्या गोष्टी लक्षांत घेतल्या, तर मी लादोझ्स्की स्टेशनवरंच उतरीन, ना की मॉस्को स्टेशनवर! सकाळपासून ह्या कोंदट कम्पार्टमेन्टमधे मी थरथरतोय. ही सगळ्यांत चांगली ट्रेन नाहीये, आणि मॉस्कोहून पीटरबुर्गला येण्यासाठी हा सगळ्यांत चांगला पर्यायसुद्धां नाहीये.”
“माफ करा, एव्गेनी गेनादेविच, ती मी नव्हते, ती दुसरी ओल्या होती. ती तुम्हांला फोन करेल.”
कुपेचं दार उघडं आहे. सहप्रवासी – एक महिला, जिचं नाव ज़िनाइदा आहे, आणि तिचा ‘डाऊन’ (मन्दबुद्धि) मुलगा झेन्या, जो वयाने मोठाच आहे, कपितोनवकडे बघताहेत. ज़िनाइदा सहानुभूतीने बघतेय, आणि ‘डाऊन’ झेन्या – आनंदाने.
हातांत झाडू घेतलेली कण्डक्टर तिथून जाते आहे, तिनेपण हे बोलणं ऐकलं :
“घाबरूं नका, लवकरंच ही ट्रेन कैन्सल होणार आहे, बघा, कम्पार्टमेन्ट अर्धा रिकामा आहे.”
“मी घाबरंत-बिबरंत नाहीये.”
आत आला, बसला. सगळे बसले आहेत, जाताहेत. आता लवकरंच पोहोचून जातील.
“आधी मला असं वाटलं, की तुमच्या मुलीने फोन केलांय,” ज़िनाइदाने म्हटलं. त्याला दुःख झालं की मुलीबद्दल हिला कशाला सांगितलं.
कपितोनवच्या डोळ्यांसमोर पांढ-या भिंतीवर काळे अक्षर पळंत होते – सशस्त्र क्रांतीचं आह्वान. त्यानंतर – गैरेजेस, कदाचित. तो ह्या बाजूने कधी पीटरबुर्गला आलेला नव्हता. लादोझ्स्की स्टेशन त्याच्या पीटरबुर्गहून मॉस्कोला जायच्या काही वर्षांपूर्वीच सुरू झालं होतं. तो फक्त एकदांच लादोझ्स्कीला आला होता – जेव्हां समर-कैम्पहून परंत येत असलेल्या आपल्या मुलीला घ्यायला बायकोबरोबर आला होता. तेव्हां ती होती अकरा वर्षांची.
ज़िनाइदाला आपल्या सहप्रवाश्याबद्दल सहानुभूती वाटंत होती:
“सॉरी हं, तुम्हांला डुलकी नाही घेता आली.”
“काही हरकंत नाही,” कपितोनवने म्हटलं.
प्रवासांत बराच वेळ काही बोलणं नाही झालं – मॉस्कोपासून, जिथे तो गाडीत बसला होता, म्हणजे, आधीपासूनंच बसलेल्या त्यांच्याबरोबर – आणि जवळ-जवळ अकूलोव्कापर्यंत. कुपेंत चौथा प्रवासी नव्हता. तिचा मुलगा सम्पूर्ण प्रवासांत छोट्याश्या टेबलवर ‘दमीनो’च्या फास्यांशी खेळंत होता, आणि कपितोनव वरच्या बर्थवर पडल्या-पडल्या छताकडे बघंत होता, जी त्याच्या अगदी जवळ होती. आणि असं दाखवंत होती की जग वाजवी नमुन्यांनीच बनलेलं आहे. तीन तासांपूर्वी, अकूलोव्काच्याही आधी, गरंज नसतानाही, पण कंटाळवाणं झाल्यामुळे, तो एकटाच ट्रेनच्या रेस्टॉरेन्टमधे चालला गेला, जिथे असं बघून की तो तिथे एकटाच आहे, बीफ़स्टेक खाऊन गेला आणि शंभर ग्राम कोन्याक पिऊन गेला, जी खरं म्हणजे, कोन्याक नव्हतीच, पण, चला, ठीक आहे. आणि जेव्हां परंत आला, तर हस-या चेह-याच्या, थकलेल्या, कुपेतल्या ह्या शेजारिणीने घरी बनवलेला केक त्याला दिला, ती हट्टंच करू लागली, की तिच्या आणि तिच्या मुलाबरोबर त्याने कुपे-डिनर घेतलंच पाहिजे. आणि तेव्हां कपितोनवने तिच्यासमोर पहिली स्वीकृति दिली: तो आत्ताच जेवून आलाय. मग तिने त्याला कित्येकदा विचारलं : “आणि ह्या सगळ्याचं आम्ही काय करायचं?” आणि त्याने उत्तर दिलं : आपल्या बरोबर घेऊन जा”. थोडक्यांत बोलणं सुरू झालं. – “ज़ीना.” – “एव्गेनी.” ‘एव्गेनी गेनादेविच’सुद्धां म्हणू शकंत होता, जसं तो बहुधा सेमेस्टरच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्वतःचा परिचय द्यायचा (जे खरंच आहे), पण त्याने म्हटलं ‘एव्गेनी’ (खोटं तर नाही सांगितलं), आणि ज़िनाइदा खूष झाली : “बघ, कसं होतं,” तिने आपल्या मंदबुद्धि मुलाला म्हटलं. “आपण दोघं चाललो आहोत, आणि आपल्याला हेपण माहीत नाहीये, की कोणाबरोबर जातोय. अंकल झेन्या, तुझेच नामराशी आहेत.” तिच्या मुलाने खिदळंत अचानक आपला हात कपितोनवसमोर करून त्याला चकीत केलं, पण तो फक्त आपली बोटंच समोर करून थांबला – खूपंच मरगळलेलं हस्तांदोलन झालं, एकीकडूनंच, म्हणजे कपितोनवकडून, पण अत्यंत प्रेमळपणे, ज्याने ज़िनाइदाला आनंद व्हावा. जसं काही त्यांच्यामधे काहीतरी घडलं होतं. कपितोनवला कळलं की ते लिपेत्स्कहून येताहेत ज़िनाइदाच्या बहिणीला भेटायला, की ज़िनाइदाला आपल्या मुलाला सेंट पीटरबुर्ग दाखवायचं आहे आणि हे की मुलाचं स्वप्न आहे – “लहानसं जहाज़” बघणं. त्याने खरोखरंच अनेक वेळा म्हटलं ‘जआज़’. “अंकल झेन्याने जआज़ पाहिलंय कां?”
कपितोनवने अनेकदा हे जहाज बघितलं होतं – एडमिरैल्टीच्या2 शिखरावर.
देवाची इच्छा असेल, तर अजूनही पाहील.
