लोणचं पोळी
लोणचं पोळी


किती साधा आणि सोपा शब्द... आणि जितका साधा तितकाच अफाट चवीचा पदार्थ... या साध्याशाच पदार्थाची श्रीमंती किती मोठी आहे, हे आपल्यातल्या खूप जणांना माहीत असेल...
अहो आपल्या त्या शाळेतली ती मधली सुट्टी आठवा... मधल्या सुट्टीची घंटा झाली की शाळेच्या आवारात झाडाखाली सात-आठ जण गोल घोळका करुन जेवायला बसायचे... प्रत्येकाचा डबा वेगवेगळा... डबा कसला?, कोणाची फक्त एखाद्या फडक्यात बांधून दिलेली भाकरी-भाजी किंवा ठेचा... तर कोणाचा आपला एका झाकणाचा साधा स्टीलचा पेढेघाटी डबा... डब्याचं झाकण घट्ट बसावं म्हणून त्याला लावलेलं कुठलंसं कापड... आणि त्यात अगदी पोळ्यांच्या किंवा भाकरीच्या खाली तळाशी असलेली थोडीशी भाजी... भाजी कमीच असायची. ती उगाच मग लावून-लावून पुरवून-पुरवून खायची... आयुष्यातील काटकसरीचा पहिला धडा येथेच मिळायला सुरुवात होते...
आणि मग याच पोळ्यांमध्ये अधूनमधून डोकावणारी ही लोणच्याच्या पोळीची श्रीमंती... पोळीची घडी उघडताच आत लोणच्याच्या दोन-तीन फोडी आणि पोळीत ते लोणचं दबकावून दिल्यामुळे सर्व पोळीभर पसरलेला त्या लोणच्याचा खाराचा लाल, पिवळा नितांतसुंदर असा नयनरम्य नजारा... अहाहा नुसत्या त्या लोणचं-पोळीच्या दर्शनाने सगळ्यांचे डोळे विस्फारले जायचे... ज्याच्या डब्यात ही पोळी त्याचा भाव लगेच वधारला जायचा... त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसू लागायची... लोणचं पोळी डब्यात म्हणजे जणू काही त्याने एखादं छोटंसं राज्यच त्याने जिंकून ताब्यात घेतलंय असा भाव असायचा...
लोणच्याच्या त्या लाल-पिवळ्या रसरशीत खाराने त्या तीन पदरी पोळीचा वरचा पापुद्रा अक्षरशः न्हाऊन निघालेला असायचा... तो असा चटकदार गोड-आंबट तिखट पापुद्रा म्हणजे चवीचा परमोच्च आविष्कार... पंचतारांकित हॉटेलात तुम्ही कितीही पैसा ओता हा असा लोणच्याच्या खाराने येथेच्छ न्हालेला पापुद्रा तुम्हाला मिळणे केवळ अशक्य...
त्या पोळीचे ते रूप बघितले की डोळे विस्फारले जायचे... हा म्हणजे जणू पोळीचा एक सणच असायचा... एखाद्या सणाच्या दिवशी जसं नुकतीच लग्न झालेली एखादी नवतरुणी कशी आपली भरजरी साडी नेसून साजशृंगार करून पूजेचे ताट घेऊन मंदिरात जाते तसं काही त्या पोळीकडे बघितलं की वाटायचं... त्यावेळी गावाकडच्या त्या पोळ्याही अशा आकाराने मोठ्या असायच्या...
अहो त्या पोळीचा त्या लोणच्याच्या खारात अगदी समरस झालेला तो नुसता एक घास तोंडात टाकला की चवीची स्वर्गीय अनुभूती आपल्या शरीरात कणाकणात भरून जायचे... सगळे शरीर रोमांचित होऊन प्रफुल्लित होऊन जायचे... त्या आंबटगोड आणि मुरलेल्या मसाल्यांचा तो जिभेवरील सुरू असलेला थैमान शरीरातील गात्र न् गात्र रोमांचित करत जायचा... जीभ आसूसलेल्या अतृप्त आशेने पुन्हापुन्हा या चवीची मागणी करू लागायची... ज्याच्या डब्यात ही पोळी तो मग राजासारखा असायचा. पण शेवटी तोही आपलाच सवंगडी... त्या पोळीचे मग चार-पाच तुकडे होऊन आपापसात वाटले जायचे आणि प्रत्येकाला या चवीचा आनंद घेता यायचा... किती छोटी गोष्ट पण केवढा तो आनंद...
आजही मी या लोणच्याच्या पोळीच्या प्रतीक्षेत कित्येक महिन्यांपासून होतो... आता म्हाळसाला साधं म्हटलं असतं तरी आपसूकच डब्यात आली असती ही लोणचं-पोळी. पण प्रतिक्षा करून अचानक डब्यातून समोर आलेल्या या पोळीकडे बघून झालेला आनंद काही और होता... तो सांगून आणि मागवून घेतलेल्या पोळीमध्ये आलाच नसता...
इतका मोठा आंनद किती छोट्या गोष्टीत असतो ना?...
असो...