आकांत
आकांत


कामानिमित्त मी विरारवरून प्रभादेवी असा प्रवास करतो. सकाळची ७ ची ड्युटी असल्यामुळे नेहमीप्रमाणे ५ वाजता घरातून बाहेर पडून ठरल्याप्रमाणे ५:१८ ची ट्रेन पकडून डुलक्या देत नाहीतर चोर झोप म्हणजेच एक छोटासा चुटका काढत प्रवास करत असतो.असाच एक दिवस मी नेहमीप्रमाणे ट्रेन पकडून कशीबशी खिडकीशेजारची सीट पकडली. खिडकी शेजारची सीट पकडण्याचा हट्टास कारण डुलकी लागली तर दुसऱ्यावर तोल नको जायला नाहीतर दोन शिव्या पडायच्या म्हणून खिडकीच्या साहाय्याने प्रवास उत्तम होतो.थंडीचे दिवस होते. खिडकीजवळ बसून थंडी लागते म्हणून खिडकी बंद करून निवांत बसलो.गाडी वेळेत सुटली मग पुढचं स्थानक नालासोपारा आले. नालासोपाऱ्यात गाडी भरगच्च होते. विरार गाडी म्हटले तर मग ती सकाळची पहिली ट्रेन असुदे नाहीतर रात्रीची शेवटची नालासोपाऱ्यात राहिलेले बाकी आसने फुल झाली.अर्धे जण खाली मांडी घालून बसून होते,अनेकजण उभे राहूनच डुलक्या काढणार होते.
डुलकी देत माझा डोळा लागत होता,थोडा अंदाज आला होता की आता वसईला गाडी थांबली होती.डोळ्यावर झोप ही सतावत होती.मी पुन्हा डोळे बंद केले आणि तितक्यात लहान मुलाचे रडणे माझ्या कानावर पडले.मी पाहिले तर एक जोडपे एका ५-६ महिन्यांच्या बाळाला घेऊन ट्रेनमध्ये चढले होते.दोघेही मस्त जीन्स पॅन्ट आणि टीशर्ट घालून बाळाला गोंजारत होते.ट्रेनमध्ये गर्दी होती म्हणून ते बाळ रडत होते असणार या कारणाने मी त्या बाळाच्या आईला बसायला माझे आसन दिले. बाळाला घेऊन ती खिडकीशेजारी बसली. नायगाव वरून गाडी सुटली होती तरीही बाळाचं रडणे काही थांबत नव्हते.जोडप्याला वाटले की बाळाला गरम होत असणार म्हणून खिडकी उघडून थोडी हवा दिली पण थंडीचे दिवस असल्याकारणाने हवा खूपच थंड होती त्यात नायगाव-भाईंदरच्या खाडी पुलावरून गाडी चालली होती.म्हणून उघडलेली खिडकी पुन्हा बंद करण्यात आली.
बाळाचं रडणे काही थांबेना. बाळ रडून रडून कासावीस झालं. खुप काही करून झाले.आज कालच्या फँशनवाल्या जगात खुळखुळे विसरून लहान मुलांना गोंजरण्यासाठी एक फँशन म्हणून सुरू असलेले मोबाईल खेळणेही त्याला दाखवून झालं,पण त्याचाही त्या निरागस आणि गोंडस बाळाच्या रडण्यावर काही फरक पडला नाही.कोणी टाळ्या वाजवून शांत करण्याचा प्रयत्न केला कोणी तोंडाने फुंकर मारून मायेचा गारवा देण्याचा प्रयत्न केला. कोणी त्याला हातावर घेऊन झोका देत झोपवण्याचा प्रयत्न केला.पण यातक्या एकाही युक्तीने बाळाचा आकांत काही थांबत नव्हता.शेवटी-शेवटी त्या बाळाच्या अंगावरचे सर्व कपडे उतरवण्यात आले,जेणेकरून चुकून का होईना मुंगी वैगरे घुसून चावली असेल या उद्देशाने. पण अस काहीही आढळून आले नाही.तितक्यात एक वयस्कर माणूस पुढे येउन म्हणाला की,"त्या बाळाला भूक लागली असणार,त्याला दुधाची गरज आहे".त्याचे ते प्रभावी वाक्य ऐकून त्या बाळाच्या आई-वडिलांच्या हृदयात धडधड व्हायला लागली. दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले.बाळाला दूध कसं पाजणार हा मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर उभा झाला होता.कारण जीन्स पॅन्ट आणि टीशर्ट घातलेली आई त्या बाळाला तेही पुरुषवर्गाच्या रेल्वे डब्यात दूध पाजू शकत नव्हती.कारण आईच्या मायेचा पदरच गायब झाला होता. काळजावर घाव घालणारं हे मोठं सत्य सर्वांच्या डोळ्यासमोर जिवंत उभं होतं.
वसई पासून ते बोरिवली येईपर्यंत त्या बाळाच्या पोटाची आग किव्हा तहान ही तशीच होती.त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू निपचितपणे तोंडात जात होते आणि शेवटी ते बाळ रडत-रडत व्याकुळ झालं असावं आणि त्याच भरल्या अश्रूंनी गप्प झोपले कदाचीत उपाशीपोटीच. कारण त्या दोघं मूर्खानी दुधाची बाटली सुद्दा सोबत ठेवली नव्हती. सुन्न झाले होते मन माझं. कानामध्ये घुमत होता त्या बाळाचा आकांत,डोळ्यासमोर दिसत होते ते वळवळ करणारे बाळ,त्याच्या अश्रूंचा पाट.सर्व अगदी सुन्न-सुन्न झाले होते.त्या दोघांच्या अशा वागण्याने माझ्या डोळ्यात अंगार पेटला होता आणि वाटले होते विचारावा जाब त्यांना की हौस-मौज,फँशन तुम्ही नक्कीच करा पण त्याला तरी काहीतरी वेळ,काळ असतो.निदान दूध पिते बाळ सोबत असताना असले नखरे का करावे.उभा जन्म पडला आहे त्यासाठी.पण त्यांना त्यांच्या चुका समजल्या होत्या हे त्यांच्या चेहऱ्यावर नकळतपणे उमजत होते.आपली माय सोबत असतानाही दोन थेंबाच्या दुधासाठी इतका मोठा आकांत करूनही पोटातली आग विझवण्यासाठी त्या बाळाने रडून फक्त लाळेचा आवंढा गिळला होता,ही मोठी शोकांतिका होती.
बोरिवली नंतर विरार गाडीने वेग वाढवला. मधल्या कोणत्याही स्थानकात न थांबता थेट अंधेरी,वांद्रे,दादर,मुंबई सेंट्रल आणि शेवटचं स्थानक चर्चगेट अशी थांबणार होती.अंधेरीला गाडी थांबल्यानंतर थोडी गर्दी कमी झाली आणि मग त्या बाळाच्या वडिलांना मी एक प्रश्न केला,"सर तुम्हाला कुठे उतरायचं आहे?"त्या माणसाने उत्तर केले,"दादर उतरने का है"!त्याच्या भाषेवरून आणि दिसण्यावरून तो अमराठी असल्याचं समजले.पुन्हा त्याला मी प्रश्न केला,"सर अभी दादर उतरने के बाद आपके बेटे को दूध पिलाना होगा,क्योंकी दादर में गाडी खाली होगी."माझे हे आधार देणारे उद्धार ऐकून तो माणूस पटकन बोलला,"सर बेटा नहीं है वो,बेटी हैं". त्याचे हे आवर्जून सांगणं म्हणजे त्या मुलींवरच प्रेम होते की मुलगी जन्माला आली म्हणून झालेला पश्चाताप. या विचारात माझं मन गुंतले. मनात अनेक प्रश्नांचा कोंडमारा सुरू झाला.मुलगी नकोशी म्हणून तर नाही न ते वेंदळेपणाने वागत असतील की खरंच त्यांचं वात्सल्य जिवंत होते.मनातल्या प्रश्नांना उत्तरं देण्यास मी माझ्यात गुंतलो तोवर दादर स्थानक आलं आणि 'अपेक्षा' असं नाव कानावर पडले.मान वर करून पाहतो तर दादर स्थानक आलं म्हणून त्या बाळाचे आई-वडील एक सुटकेचा श्वास सोडत त्या बाळाला "अपेक्षा" या नावाने हाक मारत होते आणि पुन्हा मायेने,प्रेमाने गोंजारत होते.
ते दोघे दादरला उतरले.गाडी पुढील स्थानक मुंबई सेंट्रल अस घेणार म्हणून मलाही दादरला उतरणं गरजेचे होते.त्या आईच्या खांद्यावर निपचित पडलेले बाळ,अश्रूंच्या धारेने तसंच झोपून गेल्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर तसंच उभं होत.हा आकांत मायेच्या पदराखालील दुधाच्या दोन थेंबासाठी होता.गोंडस, निरागस बाळाचे नाव त्यांनी अपेक्षा जेव्हा ठेवलं तेव्हाच त्या बाळाकडून खूप काही चांगल्या अपेक्षांची आशा त्यांनी मनात ठेवली असेल.पण तान्हा बाळाला आजच्या धावत्या जगात जीन्स पॅन्ट घातलेल्या आई-वडिलांकडून कोणती अपेक्षा होती हे त्या आई-वडिलांना कळली नाही ही मोठी शोकांतिका होती.मायेचं पांघरून घालणारी व आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई असते.माता, माय, ममता, जन्मदा, जन्मदात्री, माउली, जननी, मातृ.आई माझा गुरु , आई कल्पतरू ,सौख्याचा सागरू,माउली अशी अनेक नावाची देवदेणगी सोबत असतानाही त्या निरागस,गोंडस बाळाला दुधाच्या दोन थेंबासाठी आकांत करत निराधार असल्यासारखे वाटले.हे त्या आई-वडिलांसाठी एक लाजिरवाणी गोष्ट होती.