सांताक्लॉज...
सांताक्लॉज...


"अरे काय झालय? असं अचानक का भेटायला बोलावलंस? "
शेखर विचारत होता पण शब्द फक्त कानावर पडत होते केदारच्या, मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हते.
भुगा झाला होता मेंदूचा विचारांनी.
"काय विचारतोय मी? का बोलावलस?" परत एकदा शेखरने त्याला गदागदा हलवत विचारले
"अं? अरे नोकरी गेली रे माझी. आजच सांगितले ऑफीसमध्ये. नोव्हेंबरचा सगळा पगार दिला आणि म्हणाले उद्यापासून नाही आलात तरी चालेल.
काय करू रे आता? या करोनाने वाट लावली सगळ्यांचीच" डोळ्यांत पाणी आलं होतं केदारच्या.
एका छोट्याशा ऑफीसमध्ये कामाला होता तो. पडेल ते काम...पगार बरा मिळायचा म्हणजे...तो, बायको आणि चिंकी खाऊन पिऊन सुखी होते. फार मजा नाही पण पोट भरत होतं. आता ते ही संपलं होतं.
"होईल रे सगळं नीट. बघू...करू आपण काहीतरी " शेखर धीर देत होता पण त्याच्या मनातही धाकधूक होतीच. त्याच्या ऑफीसमध्ये पण फार बरी परिस्थिती नव्हती. फक्त अजून असं काही सांगितलं नव्हतं. दोघे घरी निघाले. पूर्ण डिसेंबर महिना असाच गेला. कुठेही नोकरीसाठी विचारले की
"सध्या काहीच व्हेकन्सी नाही"
हेच उत्तर.
इकडून तिकडून मदत घेऊन कसबस घरचं भागवलं होतं.
एका खेळण्याच्या दुकानात गेला केदार "शेठ काही काम असेल तर बघा ना. प्रामाणिकपणे करेन हो. चोरी, लांडी-लबाडी नाही करायचा. बघा ना नोकरीचं काहीतरी. काऊंटरवर..माल उचलायला...साफसफाई.. काहीही करेन. पण तेवढं जमवाच" काकुळतीला येत केदार म्हणाला.
"नाही रे ! सध्या तरी काहीच काम नाही. आमचा धंदाही मंदीतच आहे सध्या. "
निराश होत खालमानेने केदार दुकानाच्या पायऱ्या उतरु लागला
"थांब एक मिनिट!"
शेठनं परत बोलवलं.
"पर्मनंट नाही. पण काही काळापुरतं काम आहे. दोन-तीन आठवड्यांचं
करशील? "
केदारन विचार केला..
...ठीक आहे सध्या तर भागून जाईल. आनंदानं हो म्हणाला तो.
"काय काम आहे? "
"अरे आता ख्रिसमस सुरू होईल. मला त्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. या खेळण्यांचं रंगीत कागदात पॅकिंग करायचं.
पुढे मी चर्चमध्येही शब्द टाकून बघेन तुला काहीतरी काम द्यायला." हो म्हणत केदार कामाला लागला. नेटाने त्याने दुकानातलं काम हातावेगळे केलं.
सगळे बॉक्सेस टेम्पोत घालून चर्चच्या दिशेकडे वळला. ते सगळे बॉक्सेस त्यानं नीट उतरवले. काम पूर्ण केलं.
"सर! शेट काही बोलले का तुमच्याशी? माझ्या कामाबद्दल? " त्यांन तिथं विचारणा केली
"हो!
म्हणाले तर खरे....प्रामाणिक आहे..हुशार आणि मेहनतीही आहे. पण...
सध्यातरी मी तुला एक काम देऊ शकतो. हे गिफ्ट्स तू पॅक केले आहेस ना तेच शेवटच्या दिवशी सांताक्लॉज बनून वाटायचे. करशील?"
"नक्की करेन साहेब. यासारखा आनंद कुठे मिळणार? "
31डिसेंबर दिवशी तो सांताक्लॉजचे कपडे घालून संध्याकाळीच चर्च बाहेर उभा राहिला. येणाऱ्या सगळ्या मुलांना गिफ्ट्स देऊन "मेरी ख्रिसमस....हॅप्पी न्यू इयर" म्हणत रात्रभर आनंद वाटत राहिला.
सकाळी कधीतरी तो घरी आला. आवाज न करता कपडे बदलत होता. या सगळ्या कामामुळे किमान पुढच्या महिन्याचा प्रश्न सुटला होता जेवणाचा. चर्चमध्ये बक्षिसीही मिळाली होती ती वेगळी. तो कपडे बदलून अंथरुणावर पडणार तितक्यात चिंकीने त्याचा शर्ट धरला.
"बाबा मला माहित आहे. ख्रिसमसला गिफ्ट वाटणारा तो सांताक्लॉज तूच आहेस. मलाही गिफ्ट हवं आहे काहीतरी. सगळ्या छोट्या मुलांना सांताक्लॉज गिफ्ट देतो. माझा बाबाच सँटाक्लॉज असताना मला तर गिफ्ट मिळणारच. दे ना! काय आणलं आहेस माझ्यासाठी?"
आता केदार हबकला... सांताक्लॉज बनून गिफ्ट कसलं... जेमतेम जेवणापुरते पैसे मिळवू शकला होता तो. आता काय उत्तर द्यायचं हिला.
काहीच न बोलता डोळ्यातलं पाणी टिपत तो आणि बायको चिंकीला कुरवाळत बसून राहिले. चिडून ती पाय आपटत घराबाहेर गेली आणि जोरात ओरडत आनंदात घरात परत आली. तिच्या हातात रंगीत कागद गुंडाळलेले पॅकेट होते.
केदारन पाहिलं... हे असं पॅकिंग तर त्यानेच केलं होतं... त्यावर चिट्ठी होती
"उद्यापासून दुकानात ये" पळत पळत तो बाहेर आला. शेठची गाडी गल्लीतून बाहेर पडत होती...
त्याची परिस्थिती माहीत असलेला आणि त्याच्या सचोटी, मेहनतीची जाण ठेवणारा शेठ नव्या वर्षाच्या सुरुवातीला "सांताक्लॉजलाच" गिफ्ट घेऊन गेला होता...